कर्नाळा बँक घोटाळा १५ दिवसानंतर पुन्हा उच्च न्यायालयात होणार सुनावणी
गडब/सुरेश म्हात्रे
राज्यात साडेपाचशे कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणी गाजलेले कर्नाळा बँकेचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांना ईडीने अटक करून अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यांच्या प्रकृतीचे कारण देत त्यांच्या वकिलांनी जामीनावर मुक्तता करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. न्या. सानप यांच्या न्यायालयात हे प्रकरण सुनावणीसाठी सुरू आहे. आता या प्रकरणावर न्यायालयातर्फे १५ दिवसांनी युक्तीवाद होणार आहे, तोपर्यंत हे प्रकरण तहकूब करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या आर्थिक घोटाळ्यानंतर ईडीने माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष, शेकाप नेते विवेकानंद पाटील यांना अटक केली आहे. त्यानंतर सीआयडीने बँकेचे सीईओ हेमंत सुताणे आणि त्यांच्या सहकारी अपर्णा वडके यांना अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी तळोजा, कल्याण कारागृहात आहेत.
दरम्यान, विवेकानंद पाटील यांच्या प्रकृतीचे कारण देत न्यायालयाने त्यांना जामीन द्यावा, असा अर्ज पाटील यांचे वकील अॅड. राहुल ठाकूर यांनी केला आहे. त्यावर मागील दोन तारखांमध्ये सुनावणी झाली.
आज, सोमवारी (ता. २९) विवेकानंद पाटील यांच्या जामीन अर्जावर सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणीसाठीईडीचे दोन्ही वकील उपस्थित होते. तसेच, विवेकानंद पाटील यांच्या वतीने अॅड. राहुल ठाकूरही न्या. सानप यांच्या न्यायालयात उपस्थित होते. मात्र, हे प्रकरण आज चर्चेला
घेता १५ दिवसांसाठी तहकूब ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आता विवेकानंद पाटील यांच्या जामीन अर्जावर पुढील १५ दिवसांनंतर सुनावणी होवून निर्णय येण्याची शक्यता
आहे.
न्यायालयाने हे प्रकरण एक महिन्याने चर्चेस घेऊ, असे सुचित करताच विवेक पाटील यांचे वकील अॅड. ठाकूर यांनी किमान १५ दिवसांनंतर या प्रकरणी
चर्चा आणि निर्णय घ्यावा, असा युक्तिवाद केला. त्यावर १५ दिवस हे प्रकरण तहकूब करण्यात येत असल्याचे न्यायालयाने घोषित केले.
दरम्यान, कर्नाळा बँक प्रकरणी अटकेत असलेले विवेकानंद पाटील यांची जामीनावर मुक्तता व्हावी, असे त्यांच्या लाखो समर्थकांना वाटत आहे. तर जामीन मिळू नये, अशी ठेविदारांची इच्छा आहे. मात्र, सद्य:स्थितीतील राजकारण पाहता, शेतकरी कामगार पक्षाला उभारी मिळण्यासाठी विवेक पाटील यांना जामीन मिळणे गरजेचे असल्याचे शेकाप नेते सांगत आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे पुढच्या सुनावणीला न्या. सानप काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष.