दैनिक तुफान क्रांती.
इंदापूर : (दि. ५ फेब्रुवारी)
सर्वेक्षणासंदर्भात हरकती दाखल करण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी इंदापूर येथे ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना,
मराठा सर्वेक्षणासंदर्भात राज्यातील ओबीसी बांधवांनी आपल्या हरकती १६ तारखेपूर्वी चार प्रतीत सर्व संबंधितांकडे सादर कराव्यात असे आवाहन ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक पांडुरंग शिंदे यांनी केले. . ते म्हणाले की,न्यायमुर्ती बापट आयोगाचे अध्यक्ष असताना त्यांनी मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास नाही.त्यामुळे या समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देता येत नाही असे म्हटले होते. तसा स्वयंस्पष्ट अहवाल त्यांनी शासनाला दिला होता. तथापि आत्ताची मराठा लहर व आक्रमकता पाहता त्यांनी आपले मत बदललेले दिसत आहे. वर्चस्ववादी जात मानसिकतेतून घटना, कायदा स्वतः दिलेल्या आयोगाचा अहवाल गुंडाळून येथे समर्थन करतात, असा दावा शिंदे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, सत्ता व जातीच्या दहशतीपुढे असे अनेक खोटे-नाटे प्रकरणे पचविली जात आहेत. दुर्बलांचे अजून शोषण केले पाहिजे,त्यांचे काढून सबळ माणसालाच दिले पाहिजे,असे इथल्या जातीयवादी सत्ताधारी व्यवस्थेला वाटते. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर व आयोगाचा अहवाल आल्यावर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी एका सभेत नुकतेच सांगितले. असे केले तर ओबीसी समाज राजकीयदृष्ट्या जागृत होऊन मुख्यमंत्री व त्यांच्या गटाला झोपवल्याशिवाय राहणार नाही. तो समाज सत्ताधारी झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा ही शिंदे यांनी केला.तसेच पुढील दिशा स्पष्ट करताना ते म्हणाले की,
दि.१३ फेब्रुवारी रोजी संत सावतामाळी मंदिरासमोर तीन हजार जोडपी हरकती घेवून एकत्रित जमणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा निषेध करुन मोर्चाद्वारे प्रशासकीय भवनात जावून हरकती नोंदवणार आहेत.