सांगोल्यात मेळावा घेऊन शेकापला जाहीर पाठिंबा; निवडून आणण्याचा संकल्प
सांगोला:
सांगोला गेल्या साडेतीन वर्षात अनेक रुग्णांना देवदूत म्हणून धावून जाणार्या डॉ.बाबासाहेब देशमुख यांना सांगोल्यातील वैद्यकीय क्षेत्रानेही पाठिंबा जाहीर केला. वैद्यकीय क्षेत्रातील आपला माणूस विधानसभेत जाणार हे निश्चित असल्यामुळे सांगोला तालुका मतदार संघातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी डॉ.बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणण्याचा संकल्प केला. डॉ.बाबासाहेब देशमुख यांना समर्थन देण्यासाठी सांगोला पंचक्रोशीतील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, फार्मासिस्ट ,पॅरा मेडिकल-नर्सिंग स्टाफ, लॅब असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व स्टाफ- कर्मचारी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, डॉ.मच्छिंद्र सोनलकर यांच्यासह डॉक्टर्स फार्मासिस्ट उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड म्हणाले, येणारी विधासभेची निवडणूक सोपी आहे, तिरंगी लढत असल्यामुळे बाबासाहेबांचा विजय निश्चित आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण आपण गहाळ राहायचे नाही. समोरची मंडळी पैसेवाली आहेत, 5 कोट टोल नाक्यावर सापडतेत तर आता इथे किती आहेत कुणास ठाऊक. असा टोला लगावत एकीकडे धनशक्ती आहे तर आपल्याकडे जनशक्ती आहे. जनतेचा पाठिंबा आपल्यालाच असल्यामुळे आपला विजयी निश्चित होणार असल्याचेही आवर्जुन सांगितले.
डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले, मी सर्व ठिकाणी काम केले असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांच्या अडचणींची जाणीव मला आहे. मी आणि अनिकेत जीवंत आहे तो पर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून काहीही कमी पडू देणार नाही असे सांगत भविष्यकाळात 23 तारखेनंतर तुम्हाला कसलाही त्रास होणार नसल्याचा विश्वासही त्यांनी दिला.
डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले, राजकारणामध्ये आबासाहेबांनी पुरोगामी विचार पुढे ठेवून समाजकारण केले. तोच विचार यापुढील काळात ठेवून जनतेची सेवा आम्ही दोघे करणार आहोत. वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही दोघे कटीबध्द आहे. आपण आजारी पडल्यानंतर चांगला डॉक्टर शोधतो त्याचपध्दतीने सांगोला तालुक्यासाठी सुध्दा चांगल्या डॉक्टरची गरज असून आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस म्हणून डॉ.बाबासाहेबांना विधानसभेत पाठवूया असे आवाहन केले. यावेळी उषा देशमुख, डॉ.महादेव कोळेकर ,श्री.अमेय लोखंडे, श्री. पारेकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब देशमुख हे आमच्यासाठी आपल्या हक्काचा माणूस आहे. त्यांना विजयी करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिक त्यांना एकमुखी पाठिंबा देत आहोत. डॉक्टरांवरील हल्ले थांबविण्यासाठी प्रभावी उपाय योजना करण्यासाठी तसेच अन्य समस्या सोडविण्यासाठी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घ्यावा, एवढीच आमची अपेक्षा असल्याचे अनेक मान्यवरांनी सांगितले. प्रास्ताविकात विजय बंडगर म्हणाले, स्व.आबासाहेब यांच्या पश्चात पहिली निवडणूक आहे.त्यामुळे आपली जास्त जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण यशस्वी पणे पार पाडून डॉ.बाबासाहेबांना जास्तीत जास्त प्रयत्न करून भरघोस मतांनी निवडून आणू आणि कर्तृत्ववान माणसाला निवडून देवू असे आवाहन केले.सूत्रसंचालन व आभार डॉ.निरंजन केदार यांनी केले.