Site icon Tufan Kranti

तुमचा विश्वास हीच माझी ताकद- डॉ.बाबासाहेब देशमुख

शेकापचाच आमदार करण्याचा सांगलीकराचा निर्धार

सांगोला:
लोक संवादातून समृद्धीकडे जायचं असेल तर मतदारसंघातील लोकांसाठी सहज उपलब्ध राहणे हे तत्त्व स्व.आबासाहेब यांच्याकडून शिकलो आहे .अनेक वर्षापासून आबासाहेबांवर आजपर्यंत जेवढ प्रेम आणि विश्वास दाखवत आला आहात ते प्रेम आणि आपुलकी कायम आमची उर्जा वाढवणार आहे. यातून आम्हाला आणखी लढण्यासाठी बळ मिळतं. येणार्‍या काळात तुम्हा सर्वांची देशमुख कुटुंबीयांना साथ हवी आहे असे भावनिक आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केले.
सांगली आणि परिसरात वास्तव्यास असणार्‍या सांगोला तालुक्यातील नागरिकांचा, शेतकरी बांधवांचा, व्यापारांचा संवाद मेळावा काल शनिवार दि.27 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख बोलत होते. यावेळी व्यापारी बांधव, शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले की, ज्या वेळी चर्चेतून प्रश्नांची देवाण घेवाण होते तेव्हाच प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी उपाययोजना करता येऊ शकतात.हे तत्व मनाशी बाळगून आम्ही पुढेही स्व.आबासाहेबांचा वारसा अखंड चालू ठेवणार असून माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत माझे लोक आणि मी यात कधीच दुरावा येणार नाही आणि माझे पाय कायम जमिनीवर आहेत व राहतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले, स्व.आबासाहेबांनी राजकारण व समाजकारणात पुरोगामी विचार जपला. तो विचार गेल्या 5 वर्षात मागे पडला. विरोधकांकडून खोटा बोला पण रेटून बोलाचा एकच कार्यक्रम चालू आहे. विरोधकांचे नेतेच आबाच्या कार्याची स्तुती करुन त्यांच्या कार्याचा गौरव करतात. आबासाहेब नेहमी शेतकर्‍यांच्या बाजूने राहिले असून येणार्‍या काळात आम्ही दोघे बंधू शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठाम राहणार आहे. पुरोगामी विचारा टिकविण्यासाठी आम्हाला पाठबळ द्यावे, असे सांगत भविष्यकाळात सुसंस्कृत राजकारणासाठी डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी ठाम राहा असे आवाहन त्यांनी केले.
चौकट:- संपूर्ण महाराष्ट्र आबांचा आदर्श घेत होता. त्यासाठी 60 वर्षे आबांनी झिजवली.निष्ठेचा सांगोला तालुका, एकच पक्ष, एकच नेता, आणि एकच झेंडा ही ओळख…हीच ओळख आता पुसली आहे. विकासाच्या बाता करणार्‍या लोकांनी आरश्यात पाहून टक्केवारीचा पहिला हिशोब द्यावा, मग बाकीच्या विकासाच्या गोष्टी कराव्यात. विकास जनतेचा केला की वैयक्तीक विकास केला हे जनतेला समजून आले आहे.त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत सर्वसामान्य जनता शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी ठाम उभा राहील.
डॉ.अनिकेत देशमुख

Exit mobile version