सांगोला:
सांगोला शहरात गेल्या काही वर्षापासून फिरत असलेल्या एका वयोवृद्ध मनोरुग्ण माऊलीला आपुलकी प्रतिष्ठानच्या सहकार्यातून मनगाव (देहरे, नगर) येथील डॉ. राजेंद्र धामणे यांच्या माऊली परिवारात हक्काचा निवारा मिळवून देण्यात आल्यामुळे या वृद्ध माऊलीचे उर्वरित आयुष्य सर्वसामान्याप्रमाणे जाईल अशी आशा आहे.
सांगोला शहरातील महात्मा फुले चौक, शिवाजी चौक, जयभवानी चौक, कडलास नाका आदी परिसरात एक मनोरुग्ण महिला गेल्या काही वर्षापासून खडे, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास आदी वस्तू जमा करत फिरत होती. जीर्ण झालेले कपडे, वाढलेले केस, पायाला जखमा अशा परिस्थितीत ती एकदा गटारीचे पाणी पिताना दिसली. त्यानंतर तिला माऊली परिवाराकडे सोपवण्यासाठी आपुलकी प्रतिष्ठानच्या काही सदस्यांमध्ये चर्चा झाली. आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे यांच्याशी संपर्क साधून सदर महिलेला आपल्या माऊली परिवारात सहभागी करून घ्यावे, अशी विनंती केली. डॉ. धामणे यांनी संमती दिल्यानंतर आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, कार्यकारिणी सदस्य अरविंद केदार, संभाजी पाटील, सुनिल मारडे, सुभाष शिंदे यांनी स्वराज्य चे दिपक केदार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या ॲम्बुलन्समधून या महिलेला मनगाव (देहरे, नगर) येथे असलेल्या माऊली सेवा प्रतिष्ठानकडे सोमवारी सोपविण्यात आले.
शहरातील विविध भागात भटकंती करत कोणी देईल ते खाऊन, अर्धपोटी राहून रात्री फुले पंपाजवळ असलेल्या व अलराईननगर मधील काही युवकांनी तिला बनवून दिलेल्या छोट्याशा निवाऱ्यात ती झोपायची. व नंतर दिवसभर चौका- चौकातून फिरायची. बऱ्याच वेळी अनेकांना ती विवस्त्र दिसायची, तेव्हा काही सामाजिक कार्यकर्ते व महिला यांनी तिला साडी नेसवुन अनेकदा सहकार्यही केले आहे. अशा या निराधार मनोरुग्ण माऊलीचे उर्वरित आयुष्य तरी सर्वसामान्याप्रमाणे जावे यासाठी आपुलकी प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत या महिलेला माऊली सेवा प्रतिष्ठानकडे सोपविल्यामुळे अनेकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांच्या माऊली सेवा प्रतिष्ठान मध्ये सध्या ४४५ महिला आहेत. त्यांचा सांभाळ हे डॉ. दाम्पत्य करीत आहेत. बेघर झालेल्या, मानसिक संतुलन हरवलेल्या अशा घर आणि मन हरवलेल्या महिलांसाठी नगर – शिर्डी रस्त्यावर देहरे टोळ नाक्याजवळ मनगावची निर्मिती त्यांनी केली असून त्यापैकी काही महिलांना झालेल्या मुलांची संख्या ४० इतकी आहे. त्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांचं शिक्षण व इतर जबाबदारीही ते पार पाडत आहेत. अशा या सेवाभावी संस्थेला प्रत्येकाने एकदा तरी भेट देऊन त्यांच्या या निस्वार्थी कार्याला आपापल्या परीने आर्थिक सहकार्य करणे गरजेचे आहे.
– राजेंद्र यादव ( अध्यक्ष, आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला.)