व्हनाळी :
साखर उद्योग बदलत चालला आहे.शेतकऱ्यांनी ऊस शेतीकडे जोडधंदा म्हणून न पाहता व्यावसायिकपणे करावी. योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे काळाची गरज आहे.उत्पादन वाढले तरच ऊस शेती फायद्यात येईल.शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन ड्रोन फवारणीकडे वळणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
व्हन्नाळी (ता.कागल)येथे शाहू साखर कारखान्यामार्फत शेंडूर सेंटरकडील शेतकऱ्यांसाठी आयोजित ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमावेळी ते बोलत होते.या परिसंवादास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील,शाहू कृषी संघाचे संचालक दिनकर वाडकर,नामदेव बल्लाळ, महादेव निंबाळकर, सदाशिव जाधव, शामराव शेंडे,मच्छिंद्र पाटील,शंकर मेथे आदी उपस्थित होते.
श्री घाटगे म्हणाले,ऊसाचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवल्याशिवाय ऊस शेती किफायतशीर होणार नाही. शाहू साखर कारखाना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करतोच. त्याचबरोबर कारखाना विविध योजना व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.”
वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. निलेश मालेकर म्हणाले,” उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी पहिल्यांदा पिकांची संपूर्ण सूक्ष्म माहिती घेणे आवश्यक आहे. कमीत कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्याकडे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारल्याशिवाय ऊसाचे अपेक्षित उत्पादन मिळणार नाही. त्यासाठी हिरवळीच्या खतांचा बेवड, शेणखत, कंपोस्ट खत व शाहू समृद्ध सेंद्रिय खतांचा नियमितपणे वापर करणे गरजेचे आहे. रासायनिक खते एकाचवेळी भरमसाठ न देता तज्ञांच्या शिफारशीनुसार विभागून मातीआड करुन द्यावीत.”
स्वागत ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी केले. आभार ॲग्री ओव्हरसिअर अविनाश मगदूम यांनी मानले.