सांगोल्यात घुमू लागला शिट्टीचा आवाज
सांगोला:
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना निवडणूक शिट्टी चिन्हं बहाल करण्यात आले असून सांगोला तालुक्यात शिट्टीचा आवाज घुमू लागला आहे. दुपारपासूनच लहान मुलापासून ते वयोवृद्ध नागरिकांकडे शिट्टी दिसून येत असून शिट्टीचा आवाज मोठ्या प्रमाणात घुमू लागला आहे.
सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षास कोणते चिन्ह मिळणार याबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली होती. अर्ज मागे घेतल्यानंतर चिन्ह वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून शेतकरी कामगार पक्ष शिट्टी हे चिन्ह बहाल करण्यात आले आणि कार्यकर्त्यांमधून एकच जल्लोष करण्यात आला.
मतदारराजा जागा हो..अशी जोरदार हाक देत सांगोला मतदारसंघात शिट्टीचा अावाज जोरदार घुमू लागला आहे.आमदार म्हणून नव्हे तर जनतेचा सेवक बनायचे आहे, असा संकल्प करत शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मतदार राजाला साकडे घालू लागला आहे.
शिट्टी चिन्ह मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला असून यामुळे विजय सोप्पा होणार असल्याचा विश्वास शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे.