कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दिपकआबांची आग्रही मागणी ; शहाजीबापू व दिपकआबांच्या उपस्थित बैठक संपन्न
सांगोला :
चालू वर्षी सांगोला तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळा आणखी तीव्र होऊ लागला आहे. सांगोला तालुक्यातील शेती नागरिक तसेच जनावरांची तहान भागवण्यासाठी नीरा उजवा कालव्यातून तात्काळ सांगोला तालुक्यासाठी फाटा क्र ४ व ५ मधून पाणी सोडावे तसेच या पाण्यातून सोनके तलाव भरून द्यावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील व सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली.
शनिवार दि २४ रोजी पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन भवन मध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी माजी आमदार दिपकआबा बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह माजी मंत्री आ दत्तात्रय भरणे, आमदार शहाजीबापू पाटील, आ समाधान आवताडे, आ रवींद्र धंगेकर, आ. राम सातपुते यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पुढे बोलताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले, आधीच दुष्काळ आणि त्यात जीवघेणा उन्हाळा सुरू असल्याने सांगोला तालुक्यात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे. जनावरांना चारा आणि पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नीरा उजवा कालव्याच्या पाण्याचे वाटप करत असताना यातून या पाण्याची सर्वाधिक गरज असलेल्या सांगोला तालुक्याला तसेच तिसंगी तलावासाठी प्राधान्याने हे पाणी द्यावे. या पाण्यातून सांगोला तालुक्यातील लाखो नागरिक आणि जनावरांना जीवनदान मिळणार असल्याचेही शेवटी माजी आमदार दिपकआबांनी नमूद केले.