परभणी घटनेच्या निषेधार्थ सांगोला कडकडीत बंद

संविधान प्रतिमेची नासधूस करणार्‍या नराधमावर देशद्राहाचा गुन्हा दाखल करून कडक करवाई करण्याची संविधानप्रमींची मागणी

सांगोला:
परभणी जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ समस्त बौद्ध व बहुजन बांधवांच्या वतीने सोमवारी 16 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी सांगोला शहर व तालुक्याच्या वतीने समस्त बौद्ध व बहुजन बांधवांच्या वतीने 16 डिसेंबर 2024 रोजी सांगोला शहरात सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सांगोला बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. सांगोला शहर व तालुक्यातील व्यापारी, नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून या बंदला पाठिंबा दर्शवला. यावेळी, सांगोला शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह विविध महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सांगोला तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील प्रतिकात्मक संविधान प्रतिमेची विटंबना करून नासधूस करणार्‍या नराधमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा. संविधान समर्थनार्थ व वरील कृत्याच्या निषेधार्थ 11 डिसेंबर 2024 रोजी लोकशाही मार्गाने शांततेत बंदचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर जातीयवादीयांनी संविधानप्रेमींच्या आंदोलनास गालबोट लावण्यासाठी परभणीमध्ये बेकायदा जमाव जमवून दंगल करणार्‍यांची सखोल चौकशी व्हावी. कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी आंबेडकरी जनतेच्या घरामध्ये घुसून निरापराध जनतेवर खोटे गुन्हे दाखल करून अटक करणार्‍या पोलिसांवर सखोल चौकशी करून गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत. कोंबिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी निरापराध जखमी अवस्थेतील महिला पुरुष व युवकांवर कोठे गुन्हे दाखल केलेल्यांचे तात्काळ गुन्हे मागे घेण्यात यावे. संविधानाच्या समर्थनार्थ आंदोलन वकिलीचे शिक्षण घेणार्‍या दिवंगत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्या संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. संविधान विरोधी वर्तन करणार्‍या जातीयवादी गुंडांनी पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सहभागी होऊन आंबेडकरी जनतेस अमानुष मारहाण केली, त्या गावगुंडांची चौकशी होऊन ज्या पोलिसांनी जातीयवादी गुंडांना सहभागी करून घेतले त्यांची सखोल चौकशी होऊन गावगुंडांवर गुन्हे दाखल करावेत. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. सदर प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा महाराष्ट्र मध्ये उद्भवलेल्या परिस्थितीस शासन जबाबदार राहील असा इशारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ(रजि) भीमनगर सांगोला यांच्या वतीने सर्व बौद्ध समाज बांधवांनी व संविधान प्रेमींनी दिला आहे. यावेळी बापूसाहेब ठोकळे, संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार, अ‍ॅड. महादेव कांबळे, माजी नगरसेवक किशोर बनसोडे, बाळासाहेब बनसोडे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून परभणी घटनेचा जाहीर निषेध नोंदवला. यावेळी जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष तानाजीबापू बनसोडे, सचिव बाळासाहेब बनसोडे, उपाध्यक्ष अप्सरा ठोकळे, मैना बनसोडे, खजिनदार सिताराम बनसोडे, सहसचिव रुपेश बनसोडे, बापूसाहेब ठोकळे, ज्ञानेश्‍वर बनसोडे, दीपकराव बनसोडे, आबासाहेब बनसोडे, रामस्वरूप बनसोडे यांच्यासह भीम अनुयायी बौद्ध समाज बांधव, महिला व संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परभणी येथे आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करून कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली चालत्या फिरत्या तरूणांना जेलमध्ये टाकून त्यांची हत्याच केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी या तरूणाचा या कोंबिंग ऑपरेशनमध्ये बळी गेला. एका दलित बांधवावर झालेल्या अन्यायाला न्याय मागण्यासाठी गेलेल्या बीड जिल्ह्यातील देशमुख या सरपंचाचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला. अशा प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणार्‍या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. ज्या संविधानाची शपथ घेऊन सत्तेत आले, त्या राज्य सरकारला संविधानाच्या विटंबनेचे भान राहिले नाही. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा सवाल करत अशा या निष्ठूर निर्दयी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. या महाराष्ट्र बंदला संभाजी ब्रिगेड, बहूजन मुक्ती पार्टी, बहुजन समाज पार्टी, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी यासह विविध पक्ष व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला.
सांगोला शहरासह तालुक्यातील विविध गांवातून या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. या घटनेचा सांगोल्यातील भीमसैनिकांसह बहुजन सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. व यातील संबंधीतावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या बंदला शहरातील विविध राजकीय पक्षासह सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला निवेदन सादर केल्यानंतर दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले.

ALSO READ  प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विले पार्ले चा जिम्नॅस्ट आध्यान देसाई याची भारतीय संघात निवड

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000