Site icon Tufan Kranti

पाणी पळवणारा पाहिजे की दुष्काळी भागाला पाणी वळवणारा खासदार पाहिजे ; सोशल मीडियावर चर्चांचा धुमाकूळ

सांगोला : तालुका प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यात शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा विषय यंदा चांगलाच “टर्निंग पॉईंट” ठरणार असल्याचे दिसत आहे. नीरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्याला पाणी मिळवून देणारा खासदार पाहिजे की सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी बारामती आणि माळशिरस तालुक्याला पळवणारा खासदार पाहिजे अशा पोस्ट आणि चर्चांनी सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्नावर चांगलाच आवाज उठवला होता. नीरा उजवा आणि डावा कालवा पाणी वाटपात पक्षपातीपणा करून दुष्काळी भागाचे पाणी बारामती इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात जोरदार आंदोलन करून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुन्हा हे पाणी दुष्काळी भागाला वळवले होते. तसेच उजवा कालव्याचे अस्थरीकरण केल्यानंतर शिल्लक राहणारे पाणी सांगोला शाखा कालव्याला देण्याची तरतूद असल्याने माळशिरस तालुक्यात सत्ताधारी मंडळींनी जाणीवपूर्वक अस्थरीकरणाला विरोध करून सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी अडवले होते. यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनात अकलूजकरांबाबत कमालीचा असंतोष आहे.
नीरा उजवा कालव्याच्या पण्यासोबतच खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या टेंभू योजनेच्या विस्तारासाठी विशेष प्रयत्न केले. टेंभूच्या विस्तारातून अधिकचे २ टी एम सी पाणी सांगोला तालुक्याला मंजूर करण्यात खा निंबाळकर यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्याचबरोबर अनेक वर्षे धूळखात पडलेल्या स्व बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील वंचित गावांना २ टी एम सी पाणी तसेच म्हैसाळ योजनेच्या विस्तारातून अधिकचे पाणी मिळवून देण्यासाठी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगोला तालुक्यातील आजी माजी आमदारांच्या खांद्याला खांदा लावून प्रयत्न केले आणि अधिकचे तब्बल ५ टी एम सी हून अधिक पाणी दुष्काळी सांगोला तालुक्याला मिळवून दिले. शेतीच्या पाण्याबरोबरच तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारच्या “हर घर जल” अभियानाअंतर्गत प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक वाडी वस्तीवर लोकांच्या घरी पिण्याचे पाणी पोहचावे यासाठी “जलजीवन मिशन” आणि “राष्ट्रीय पेयजल” योजनेअंतर्गत हजारो कोटींचा निधी आणला. सध्या सांगोला तालुक्यात ही कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच घरोघरी या योजनाद्वारे पिण्याचे पाणी पोहचणार आहे.
माळशिरस आणि बारामती तालुक्याने शेतीच्या पाण्याबाबत आपल्यावर अन्याय केला अशी भावना नेहमीच सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनात राहिली आहे अशातच सांगोला तालुक्यासाठी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाण्यासाठी लक्षणीय प्रयत्न करून त्यात यश मिळवल्याने सांगोला तालुक्यात पाणी पळवणारा नको तर आपल्याला पाणी वळवणारा पाहिजे अशीच चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.
चौकट ;
दोघांनी डोळ्यात पाणी आणले तर एकाने प्रत्यक्ष शेतातच पाणी आणून दाखवले
माढा लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत खा शरदचंद्र पवार माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिनिधित्व केले. खा शरद पवार यांनी तर सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्न कायम स्वरुपी मिटवू अशी मावळत्या सूर्याला साक्ष मानून शपथ घेतली होती. खा शरदचंद्र पवार आणि माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील या दोघांनाही पाणी प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयश आले मात्र विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रत्यक्ष माण नदीत आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणून दाखवले आणि दुष्काळी सांगोला तालुक्यातील जनतेचे डोळे पुसण्याचे काम करून दाखवले असल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे.
Exit mobile version