श्री. बी. आर. माळी : रवळनाथच्या १३ व्या सांगोला शाखेचा उद्घाटन सोहळा
सांगोला : रिजर्व्ह बँकेचे सर्व निकष पुर्ण करणारी आणि नियमांचे काटेकोर पालन करुन बँकींग व्यवसाय करणारी ‘रवळनाथ’ संस्था आहे. त्यामुळे ‘रवळनाथ’ संस्थेचा सहकार क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर पोहचणार अशा संस्था जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचल्या पाहीजेत अशी अपेक्षा मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री. बी. आर. माळी यांनी व्यक्त केली. श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी लि., आजरा (मल्टी स्टेट) प्रधान कार्यालय गडहिंग्लज या संस्थेच्या सांगोला येथील १३ व्या शाखेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. करमाळा तहसिलदार सौ. शिल्पा घोंगडे, सांगोल्याचे तहसिलदार श्री. संतोष कणसे हे प्रमुख अतिथी तर सांगोला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुध्दचंद्र झपके, श्री रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले, सांगोला शाखा चेअरमन प्रा. डॉ. डी. एन. काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. बी. आर. माळी म्हणाले, भविष्यातील तरतुदींसाठी आपण बचत, गुंतवणुक करत असतो. परंतू बाजारात आज असंख्य फायनान्स कंपन्या आल्या आहेत. अल्पावधित त्या बुडत आहे. लोकांची आर्थिक फसवणूक होत आहे. अशावेळी आपण संस्थांची क्षमता, कार्यप्रणाली, नियमावलीचे पालन याची तपासणी करून गुंतवणूकीसाठी ‘रवळनाथ’ सारख्या चांगल्या संस्थांची निवड करायला हवी. सौ. शिल्पा घोंगडे म्हणाल्या, आजऱ्यासारख्या दुर्गम भागात ‘रवळनाथ’ संस्था सुरु झाली. सभासदांचा मोठा विश्वास या संस्थेने संपादन केला आहे. त्यामुळेच अल्पावधित शाखा विस्तारांसह या संस्थेची झालेली प्रगती उल्लेखनीय आहे. संस्थेचा हा वाढता विस्तार कौतुकास्पद असून संस्थेच्या अनेक शाखा निर्माण व्हाव्यात.श्री. संतोष कणसे म्हणाले, समाजाचा राहणीमानाचा दर्जा सुधारला पाहीजे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या भुमिका प्रामाणिकपणे पार पाडायला हव्यात. मानवी जीवन उच्च स्तरावर पोहचवून ते सुखी करण्यात वित्तीय संस्थांची योगदान मोठे आहे. परंतू अलिकडे अनेक संस्था निर्माण झाल्या आणि लयास गेल्या. असे न होता ‘रवळनाथ’ संस्थेप्रमाणे संस्था उत्तम प्रकारे कशा चालवल्या जातील यासाठी प्रयत्नशील राहीले पाहीजे.
प्रारंभी श्री बी. आर. माळी यांच्या हस्ते सांगोला शाखेचे फित सोडून उदघाटन व प्रतिमा पुजन, दिपप्रज्वलन झाले. त्यानंतर श्री. तात्यासाहेब केदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सांगोला शाखेचे चेअरमन प्रा. डॉ. डी. एन. काशीद, शाखा सल्लागार प्रा. डॉ. विजयकुमार घाडगे, प्राचार्य डॉ. राजेंद्र गायकवाड, प्रा. डॉ. रामचंद्र पवार प्रा. डॉ. सीमा गायकवाड, सौ. शुभांगी घोंगडे, शाखाधिकारी श्री. सुशांत जिजगोंडा यांचा परिचय करुन देण्यात आला. या प्रसंगी प्रा. शुभांगी घोंगडे यांनी शुभेच्छा संदेशाचे वाचन केले, प्रा. प्रबुध्दचंद्र झपके यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाखा चेअरमन प्रा. डॉ. डी. एन. काशीद यांनी स्वागत केले. रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांनी प्रास्ताविक केले. गौरी बेळगुद्री व माधुरी जाधव यांनी सुत्रसंचलन केले. प्रा. डॉ. रामचंद्र पवार यांनी आभार मानले. उदघाटन समारंभास सांगोला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, विद्यामंदीर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. गायकवाड, रवळनाथचे संचालक प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, श्री. महेश मजती, सीईओ श्री. डी. के. मायदेव यांच्यासह संपदा चौगुले, सौ. प्राची मायदेव श्री. सुनिल पट्टणशेट्टी, सभासद, सर्व संचालक, शाखा चेअरमन, शाखा सल्लागार, अधिकारी, कर्मचारी व सांगोल्याचे नागरीक उपस्थित होते.