३५ टन तांदूळ घेऊन काळ्या बाजारात जाणारा ट्रक हदगावांत पकडला

ट्रक मधील तांदूळ रेशनचा असल्याचा पोलिसांचा संशय 
हदगांव/प्रतिनिधी:
नांदेड येथून ३५ टन तांदळाने भरून पूर्व विदर्भात जाणारा संशयास्पद स्थितीत उभा असलेला ट्रक (एमएच २६ बीई ४६४९) रात्री उशिरा हदगांव पोलिसांनी पकडला. सदर तांदूळ रेशनचा असल्याचा पोलिसांचा संशय आहे. सदर प्रकरणी तहसीलदार हदगांव यांना कारवाई करण्यासाठी मार्गदर्शन मागितले, असल्याचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ पवार यांनी सांगितले.
केंद्र सरकारने अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत नागरिकांना अत्यल्प दरात आणि काही प्रवर्गातील लोकांना मोफत धान्य पुरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाला अनुसरून प्रत्येक कुटुंबाला ३५ किलो धन्य दिले जात आहे. परंतु या धान्यातील तांदळाचा दर्जा सुमार असल्यामुळे नागरिक खाण्यास टाळाटाळ करतात. तर अनेक नागरिकांना काही तरी तृटी दाखवून स्वस्त धान्य वितरक धान्य देत नाहीत. अशा अतिरिक्त तांदळाची परस्पर विल्हेवाट लावली जाते. गरीब लाभार्थी शासकीय योजनेतून मिळणारे धान्य अर्थात तांदूळ उचलून किरकोळ विक्रेत्यांना विकतात. असे किरकोळ विक्रेते सतरा-अठरा रुपये किलो प्रमाणे विकत घेऊन जातात. या घाऊक विक्रेत्यांकडून २२-२३ रुपये दराने खरेदी करून असा दुय्यम दर्जाचा तांदूळ धान्य तस्कर पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया भागात असलेल्या राईस मिल कडे पाठवतात. या धान्य व्यापारात दरमहा नांदेड जिल्ह्यातून सुमारे ऐंशी ते शंभर ट्रक पूर्व विदर्भात पाठवले जातात अशा तांदळाची बनावट बिल्टी तयार करून ट्रान्सपोर्टच्या नावावर गाडीसोबत दिली जाते. विशेष म्हणजे ह्या धान्याची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्याकडे हा तांदूळ कुठून येतो किंवा कुठे खरेदी केलेला आहे, याबाबत कुठलेही अधिकृत दस्तऐवजत नसतात. तरी पण हप्ते आणि राजकीय लोकांच्या दबावाच्या जोरावर हा धान्याचा व्यापार जोमात बहरलेला दिसून येत आहे. गोरगरीब जनतेच्या लेकरा बाळांच्या मुखातील घास हे धान्य तस्कर काढून घेऊन हे धान्य तस्कर आपले उखळ पांढरे करून घेतात.
असाच एक ट्रक (नोंदणी क्रमांक एमएच २६ बीई ४६४९) नांदेडहून येऊन हदगांव जवळ नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठा शिवारात संशयास्पद स्थितीत थांबवलेला हदगांव पोलिसांच्या पेट्रोलिंग गाडीला काल दि. १८ रोजीच्या उत्तररात्री सुमारे एक वाजता आढळून आला. संशयावरून पोलिसांनी ट्रकचालक वैजनाथ केंद्रे याच्याकडे चौकशी केली असता, त्याने थेट धान्य वितरकाला फोन लावून पोलीसांनी गाडी पकडल्याचे सांगितले. चालक आणि मालकाच्या संवादातील भाषेवरून नक्कीच हा काहितरी गैरप्रकार किंवा गडबड घोटाळा असल्याचा पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता चालकाने पोलीस कर्मचाऱ्यांना उडवा उडवीची उत्तरे देत आणि लवकरच मालक येत आहे, असे सांगून टाळण्याचा प्रयत्न केला. आठरा टनाची वाहतूक क्षमता असलेल्या या ट्रक मध्ये तब्बल ३४४.६ क्विंटल धान्य असल्याचे ट्रान्सपोर्ट कंपनीचे कागदपत्रे ट्रक चालकाने दाखवले. सर्व बोलणे, चालणे आणि कागदपत्र हे संशयास्पद असल्याचे दिसून आल्यामुळे हदगांव पोलिसांनी सदर मालवाहू ट्रक हदगांव पोलीस ठाण्यात आणून लावला.
सदर ट्रक मधील हा तांदूळ नांदेड जिल्ह्यात किंवा परिसरातील भागात कुठेही उत्पादित झालेला असू शकत नाही. तो शासकीय स्वस्त धान्य वितरण प्रणालीतीलच असल्याचा संशय असल्यामुळे सदर प्रकरणी ट्रक मधील तांदूळ हा शासकीय वितरण प्रणालीतीलच असल्याची खात्री केल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असून याप्रकरणी तहसीलदार हदगांव यांच्याकडून हदगांव पोलिसांनी मार्गदर्शन मागवले आहे.
ALSO READ  अजित पवारांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा जाहीर

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000