विधानसभा निवडणुकीत मनसेचे ‘एकला चलो रे
गडब:
आतापर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवल्या असून आगामी विधानसभेतही आम्ही २०० ते २२५ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे, असं मोठं विधान मनसे नेते बाळा नांदगावर यांनी केलं आहे. मुंबईतल्या रंग शारदा येथे पार पडलेल्या मनसेच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आगामी विधानसभा स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.
आगामी विधानसभेसाठी आमची युतीसाठी कोणाशीही चर्चा सुरू नाही. आतापर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवल्या आहेत. त्यामुळे माध्यमांमध्ये ज्या बातम्या येत आहेत. त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत.
आजच्या बैठकीत राज ठाकरेंनी आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही २०० ते २२५ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली. ज्या मतदरासंघात आम्हाला आजपर्यंत चांगली मतं मिळाली आहेत, त्या मतदारसंघात आम्ही निश्चित आमचे उमेदवार देऊ. त्याबाबत पक्षाच्या बैठकीत चर्चा केली जाईल. मनसेचे पदाधिकारी लवकरव संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यादरम्यान ते प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतील, तसेच त्यासंदर्भातील अहवाल राज ठाकरे यांना सादर केला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.