गट विकास अधिकारी यांना मारहाण करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा
खुडूस:
गट विकास अधिकारी, पंचायत समिती माळशिरस यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत संबंधित आरोपींना २४ तासांचे आत अटक न झालेस दि. १७/१२/२०२४ पासुन अटक होईपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन करीत असल्याचे निवेदन तहसीलदार व माळशिरस पोलीस स्टेशनला देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,गुरुवार दि. १२/१२/२०२४ रोजी गट विकास अधिकारी, पंचायत समिती माळशिरस यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी तत्कालीन कंत्राटी कर्मचारी यांनी अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करुन त्यांना मारहाण केल्याने व जीवे मारण्याची धमकी दिलेली असल्याने संबंधित आरोपींचे विरोधात माळशिरस पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. परंतु संबंधित आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. सदरची बाब ही निश्चितच खेदजनक आहे. त्यामुळे जोपर्यंत संबंधित आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत जिल्हा परिषद कर्मचारी दि.१७/१२/२०२४ पासुन बेमुदत कामबंद आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असून जिल्हा परिषद कर्मचारी महासंघा तर्फे आपणास या पत्राद्वारे पूर्व नोटीस देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दि.१७ डिसेंबर, २०२४ रोजी पासुन आम्ही पंचायत समिती, सर्व उप विभाग, पशुसंवर्धन दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील सर्व जिल्हा परिषद कर्मचारी हे बेमुदत संपावर जाणार असल्याचे निवेदन तहसीलदार व माळशिरस पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.