महाराष्ट्र भूषण ; अशोक सराफ

महाराष्ट्र भूषण  ; अशोक सराफ     
     मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ  अभिनेते, विनोद सम्राट, चित्रपट सृष्टीचे मामा अशोक सराफ यांना २०२३ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे. अशोक सराफ यांच्यासारख्या जेष्ठ अभिनेत्याला हा पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. योग्य व्यक्तीला  योग्य वेळी मिळालेला योग्य पुरस्कार असेच या पुरस्काराचे वर्णन करता येईल. महाराष्ट्र सरकारने अशोक सराफ यांना हा पुरस्कार देऊन त्यांच्या पाच दशकांच्या अभिनय कारकीर्दीचा योग्य गौरव केला या बद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानावे लागेल.  अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी मुंबईत झाला. मूळचे बेळगावचे असणारे अशोक सराफ यांचे बालपण मुंबईतील चिखलवाडी भागात गेले. त्यांचे शिक्षण मुंबईतील डि. जि. टी  विद्यालयात झाले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी ययाती आणि देवयानी या नाटकात विदुषकाची भूमिका साकारली होती. दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटातील त्यांनी साकारलेली  इरसाल हवालदाराची भूमिका खूप गाजली. दादा कोंडके यांच्याच राम राम गंगाराम या चित्रपटात त्यांनी म्हमद्या खाटीक ही भूमिका साकारली. कारकिर्दीच्या सुरवातीलाच केलेल्या विनोदी भूमिका लोकप्रिय ठरल्याने त्यांना विनोदी भूमिकाच मिळत गेल्या आणि त्यांनीही त्या भूमिकांना न्याय देऊन प्रेक्षकांना खळखळून हसवले.  ८० च्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या समवेत त्यांची जोडी जमली. पडद्यावरील अशोक सराफ आणि लक्षा या जोडीने मराठी  चित्रपटसृष्टित अक्षरशः धुमाकूळ घातला. या दोघांनी एकत्र अभिनय केलेल्या अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, दे दणादण यासारख्या चित्रपटांनी धमाल उडवून दिली. सचिन आणि महेश कोठारे या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले व अशोक सराफ यांनी अभिनय केलेले नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा शुभ मंगल सावधान, आई नंबर वन, एक शेर दुसरी सव्वाशेर , नवरा पावशेर, नवसाचा नवरा आयडीयाची कल्पना हे चित्रपट देखील लोकप्रिय झाले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदी भूमिकाच केल्या असे नाही तर काही गंभीर भूमिका देखील केल्या. वजीर चित्रपटात त्यांनी  साकारलेला गंभीर राजकारणी भाव खाऊन गेला तर चौकट राजा चित्रपटातील त्यांनी साकारलेली सहृदय व्यक्तीची भूमिका लोकांच्या मनात घर करून गेली. अशोक सराफ यांनी अभिनय केलेले आई नंबर वन, आत्मविश्वास, नवरी मिळे नवऱ्याला, धुमधडाका, गंमत जंमत, माझा पती करोडपती, दे दणादण, एक डाव भुताचा, भुताचा भाऊ, शेजारी शेजारी, एक उनाड दिवस, अफलातून,  गोंधळात गोंधळ, अशी ही बनवाबनवी, सगळीकडे बोंबाबोंब, आयत्या घरात घरोबा, कुंकू, घनचक्कर, वजीर, एकापेक्षा एक, अनपेक्षित, चंगू मंगू , शुभमंगल सावधान, आमच्या सारखे आम्हीच, बाळाचे बाप ब्रह्मचारी, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, गोष्ट धमाल नाम्याची, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, कळत नकळत, अरे संसार संसार, आपली माणसं, एक डाव धोबीपछाड, आयडीयाची कल्पना, साडे माडे तीन हे त्यांनी अभिनय केलेले चित्रपट विशेष गाजले. त्यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटातही काम केले. करण अर्जुन, कुछ तुम कहो कुछ हम कहे, बडे घर की बेटी, बेटी नंबर वन, कोयला, गुप्त , संगदिल सनम, प्यार किया तो डरणा क्या?,  जोरू का गुलाम, खूबसुरत, यस बॉस, सिंघम या हिंदी चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिका विशेष लक्षात राहण्यासारख्या आहेत. हम पांच, टन टना टन टन, डोन्ट वरी हो जायेगा, छोटी बडी बाते यासारख्या काही टीव्ही मालिका देखील त्यांनी केल्या. त्यांनी भूमिका केलेले हमीदा बाईची कोठी, अनधिकृत मनोमिलन, हे राम, कार्डिओग्राम, सारखं छातीत दुखतंय ही नाटकेही खूप गाजली. चित्रपट, टीव्ही, रंगमंच अशा तिन्हीं माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाची मुशाफिरी केली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी २०० हुन अधिक चित्रपटात भूमीका केल्या. रंजना, उमा भेंडे, प्रेमा किरण, निवेदिता जोशी, वर्षा उसगावकर, अश्विनी भावे,  अलका कुबल, प्रिया बेर्डे, किशोरी शहाणे या आणि अशा अनेक अभिनेत्रींसोबत त्यांनी भूमिका केल्या. विशेष म्हणजे या सर्व अभिनेत्री त्यांना सेटवर मामा म्हणत. आज तर ते संपूर्ण चित्रपट सृष्टीचे मामा झाले आहेत. आज त्यांना अशोक मामा याच नावानेच ओळ्खले जाते. अशोक सराफ यांना अशोक मामा हे नाव कसे पडले हे पाहणे देखील रंजक आहे. एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे  नावाच्या कॅमेरामन सोबत त्यांची मुलगी येत असत. सेटवर आली की ती विचारत असे, हे कोण ? त्या कॅमेरामनने सांगितले हे अशोक सराफ पण तू यांना मामा म्हणायचे. त्या मुलीसोबत सेटवरील सर्वजण त्यांना मामा म्हणू लागले पुढे हेच नाव रुढ झाले आणि अशोक सराफचे अशोक मामा बनले. अशोक सराफ यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत मात्र ते नेहमी म्हणतात  की प्रेक्षकांच्या  मनात मी स्थान निर्माण करू शकलो हाच माझ्यासाठी सर्वोत्तम पुरस्कार आहे आणि ते सत्यही आहे. अशोक सराफ यांच्यावर मराठी प्रेक्षकांनी जितके प्रेम केले तितके कोणत्याच अभिनेत्यावर केले नसेल. जवळपास पाच दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या  मनात आढळ स्थान निर्माण करून प्रेक्षकांना  खळखळून हसवणाऱ्या या विनोदाच्या अभिनय सम्राटाचा महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार देऊन महाराष्ट्र सरकारने  योग्य असा गौरव केला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल विनोद सम्राट अशोक सराफ यांचे हार्दिक अभिनंदन!!!
श्याम ठाणेदार 
दौंड जिल्हा पुणे 
ALSO READ  आज जातीवरुन आरक्षण का?

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000