कोळा जुनोनी भागात रंगतदार चर्चा, पैजांना ऊत…?
कोळा:
सांगोला तालुक्यातील पश्चिम भागातील डोंगर पाचेगाव किडबिसरी कोळे कराडवाडी कोंबडवाडी तिप्पेहळी जुनोनी जुजारपुर हटकर मंगेवाडी हातीद या परिसरात सुमारे गेले दीड महिना लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत होते. उन्हाळ्यातील प्रचंड उष्म्याबरोबरच राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. माढा लोकसभेच्या निवडणूक निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे. निकालास महिनाभराचा अवधी असला तरी मतदानाची आकडेवारी व तज्ज्ञांची मते जाणून घेऊन निकालाचे अंदाज बांधले जात आहेत. निवडून कोण येणार, यावरून गावोगावी पैजा लागल्या आहेत. यात नागरिकांसह राजकीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे.
कोळा जिल्हा परिषद गटात मंगळवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.यावेळी कोळे कराडवाडी कोंबडवाडी गावात एकूण मतदान ११७९७ पैकी ७०१६ मतदारांनी हक्क बजावला एकूण ५९ टक्के मतदान झाले तसेच जुनोनी काळूबाळूवाडी गावात ४७१७ मतदारापैकी २९३९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला एकूण ६२ टक्के मतदान झाले मतदान झाल्यानंतर राजकीय घडामोडी थंडावल्या, आता कोण उमेदवार निवडून येणार याबाबत पैजा लावल्या जात असून, चर्चाना ऊत आला आहे.सध्याची माढा लोकसभा निवडणूक ही तालुक्यातील किंबहुना सांगोला विधानसभा मतदारसंघातील अनेक नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई होती.राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. ही राजकीय लढाई भाजपा-शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी व घटक पक्ष विरोधी राष्ट्रीय काँग्रेस, शरद पवार गट राष्ट्रवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व मित्रपक्ष गट, अशी सरळ लढत होती. लोकसभा निवडणूक रिंगणात अनेक उमेदवार असले तरी खरी लढत महाविकास आघाडीचे धैर्यशील भैय्या मोहिते पाटील व महायुतीचे रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत जोरात झाली मतदानही चुरशीने झाले होते.
आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नांदी असणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील नेत्यांची नेमकी भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते; मात्र आगामी निवडणुकांची समीकरणे जुळवून आणण्यासाठी सोयीनुसार पक्ष एक पाठिंबा दुसऱ्या उमेदवाराला, अशा भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ही निवडणूक तालुक्यातील नेत्यांच्या प्रतिष्ठेची झाली होती. सर्व नेतेमंडळी प्रचारात् अग्रभागी राहून पदयात्रा, प्रचार सभेच्या माध्यमातून गावागावात जाऊन आपल्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येत होते.मतदानानंतर आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा असून, तालुक्यात कोणता उमेदवार किती मताधिक्य घेणार, किंबहुना कोण विजयी होणार, याबाबत रंगतदार चर्चा सुरू आहेत. कार्यकर्ते आपला उमेदवार कसा निवडून येणार याचे गणित मांडत आहेत आणि पैजाही लावल्या जात आहेत; मात्र या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.विधानसभा क्षेत्रनिहाय झालेले मतदान, मागील मतदानाची तुलना, आकडेवारीबाबत तज्ज्ञांचे मत याच्या आधारे निकालाचा अंदाज बांधला जात आहे.स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांकडून कानोसा घेत तसेच कोणता गठ कोणासोबत राहिला या आधारेही अंदाज मांडला गेला.काहींनी ज्योतिषाच्या आधारेही अंदाज व्यक्त केला आहे. त्याआधारे पैजा लावल्या आहेत. कोळा जुनोनी भागात पाच हजारांपासून लाख रुपयांपर्यंतच्या पैजा लागल्या आहेत. पैजा लावणाऱ्यांमध्ये सामान्य नागरिकांपासून राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, व्यावसायिक, उद्योजक यांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे…