सोलापूर :
मृग नक्षत्राला सुरूवात झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यात दररोज पावसाच्या दमदारी सरी कोसळत आहेत. बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी ३०.१ मिलीमीटर पाऊस झाला असून माढा व बार्शीसह उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, करमाळा आदी भागात पावसाचा जोर दिसून येतो. या पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहात आहेत. मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे ओढ्यावरील पुलावर वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात तिघेजण वाहून गेले. सुदैवाने त्यापैकी दोघे बचावले असून तिसरा तरूण बेपत्ता आहे. बार्शीजवळ ओढा वाहून गेल्यामुळे त्या भागातील संपर्क तुटला आहे. तर दुसरीकडे अक्कलकोटमध्ये कुरनूर धरणात पाण्याचा प्रवाह येऊ लागल्याने तेथील शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.
सोलापूर शहरात रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावली असून २४ तासांत ५६.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. माढा-५८.२, बार्शी-४६.१, उत्तर सोलापूर-४०.४, मोहोळ-३५.३, करमाळा-३४.७, दक्षिण सोलापूर-३२.७, पंढरपूर-२२.९, अक्कलकोट-२२.३, माळशिरस-१९, सांगोला-१६.३, मंगळवेढा-१३.३ याप्रमाणे तालुकानिहाय कमीजास्त पडलेल्या पावसाची आकडेवारी आहे. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात सरासरी १८०.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक ८५.८ मिमी पाऊस माढा तालुक्यातील रांझणी तर याच तालुक्यातील दारफळ या मंडळात ८४. ५ मिमी पाऊस बरसला. याच तालुक्यात कुर्डूवाडीत ७९.५, तर म्हैसगाव मंडळात ६३.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोर्टी (करमाळा) व सुर्डी (बार्शी) येथे प्रत्येकी ७२ तर खांडवी (बार्शी) मंडळात ६९ मिमी पाऊस बरसला. दक्षिण सोलापूर तालुक्यात बोरामणीत ५६.८ तर मुस्ती येथे ५२ मिमी पाऊस झाला. मार्डी (उत्तर सोलापूर)-५७, करकंब (पंढरपूर)-५२, शेटफळ-५२, नरखेड-४७ (ता. मोहोळ) आदी मंडळांमध्ये पावसाचा विशेष जोर होता.