सोलापूर:
दक्षिण सोलापूर तालुकायला तांदुळवाडी गावात बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाई झाली असून, मल्लिकार्जुन भिमाशंकर कुंभार (वय ६३) यांच्यावर बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालील तालुका बोगस डॉक्टर दक्षता समितीने या प्रकरणात कारवाई केली, ज्यात कुंभार रुग्णांवर उपचार करताना आढळले. तपासणीदरम्यान त्यांच्याकडे आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले आहे.
कुंभार यांची मुलगी सन २०२२ मध्ये होमिओपॅथी डॉक्टर झाली आहे, तरीही कुंभार मागील तीस वर्षांपासून बोगस वैद्यकीय प्रॅक्टिस करत रुग्णांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे.
दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी तालुका बोगस डॉक्टर दक्षता समितीच्या अध्यक्षा डॉ. निलम संपतराव घोगरे यांच्या नेतृत्वाखालील तपासणी पथकाने कुंभार यांच्या शिवशक्ती आयुर्वेदालयाची तपासणी केली. तपासणीदरम्यान, पथकातील पंच भगवान कमसर चव्हाण, केदार रमेश गायकवाड आणि कल्पना लक्ष्मण सावंत यांच्या उपस्थितीत कुंभार एका रुग्णावर उपचार करताना आढळले. तपासात कुंभार यांच्याकडे ना अलोपॅथी, ना आयुर्वेदिक, ना होमिओपॅथिक कोणत्याही वैद्यकीय प्रॅक्टिससाठी अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले.
तपास पथकाने घटनास्थळी औषधे आणि उपचार साहित्य जप्त करून पंचनामा केला. कुंभार यांनी लेखी स्वरूपात आपला अलोपॅथी व्यवसाय असल्याचे मान्य केले. परंतु त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाचा कोणताही पुरावा नसल्याने, भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा १९६१ च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यामुळे दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अधिनियमांतर्गत BNS कलम ३१९ (२), ३१८ (४) आणि ३३ नुसार शासनातर्फे FIR दाखल करण्यात आले आहे. मात्र कुंभार यांना अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही.
या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष रोहित लालसरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी तब्बल दहा महिने सातत्याने या कारवाईसाठी पाठपुरावा केला होता.