तुफान क्रांती/ दौंड :
बनावट नोटा वापरणाऱ्या दोघा परप्रांतीयांना यवत पोलिसांनी दि १ ऑक्टोबर रोजी पाटस येथिल पुणे सोलापूर महामार्गांवर असणाऱ्या उड्डाण पुलाखाली पकडले असून त्यांच्याकडून दीड लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज यांना गोपनीय बातमीदारांमार्फत दोन अज्ञात व्यक्ती बनावट नोटा वापरण्यासाठी पाटस येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस व पाटस पोलीस आणि महाराष्ट्र बँकेचे प्रतिनिधी यांनी सापळा रचून बुधवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अमितकुमार रामभाऊ यादव (वय ३१)मूळ रा. भमारपुरा ता -जालेय जि -दरभंगा राज्य बिहार, हल्ली रा. शालिनी कॉलेज, कोंढावा,पुणे व राकेश चंद्रशेखर यादव, रा.दरभंगा, बिहार यांची झाडती घेतली असता त्यांच्याजवळ ५०० रुपयांच्या ०४ एनएम सिरीजच्या ३०० नोटा एकूण दीड लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्याने दोघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरदार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव धडस,पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख,सा. फौजदार महेंद्र फणसे, सा. फौजदार भानुदास बंडगर,पो. हवा. अक्षय यादव, पो. हवा. विकास कापरे, पो. हवा.हिरामण खोमणे, पो काँ. दत्तात्रय टकले,गणेश मुटेकर यांनी केली.