सोलापूर:
जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय व सर्वोपचार रुणालयातही सर्पदंश प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. सर्पदंश झाल्यानंतर वेळ न घालवता त्या व्यक्तीला नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करावे त्यामुळे सर्पदंशाने व्यक्ती दगावण्याचा धोका कमी होईल.असे जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. संतोष नवले यांनी सांगीतले.
उन्हाळ्यातील एप्रिल व मे या दोन महिन्यात जिल्ह्यात सर्पदंशाच्या ३७ घटना घडल्या आहेत. एकाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, आता पावसाळ्याला सुरवात झाल्याने शेतीत मशागतीची, पेरणीची कामे सुरू झाली आहेत. याचवेळी सापांचाही वावर वाढत असल्याने शेतशिवारासह घरातही सर्पदंशाच्या घटना वाढतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. तर या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागानेही सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश प्रतिबंधक लसी उपलब्ध करून दिल्या आहेत.
एप्रिल ते मे महिन्यात जिल्ह्यात ३७ जणांना सर्पदंश झाला आहे. जिल्ह्यातील १७ ग्रामीण रुग्णालयांपैकी नऊ ग्रामीण रूग्णालयात ३० तर प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे सात सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार झाल्याची नोंद आहे. त्यांच्यावर उपचार करून रुग्णांना वाचविण्यात यश आल्याने एकाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, आता पावसाळ्याला सुरवात झाली आहे.
त्यामुळे शेतीकामांची लगबग सुरू झाली असतानाच सापांचाही वावर वाढणार नाही याची काळजी घ्यावी. घरात सतत साप येत असल्यास दोन बोळे रॉकेलमध्ये बुडवून ते दारे, खिडक्या यात ठेवावेत. जेणेकरून त्याच्या वासाने साप येणार नाहीत.
घरासह आवारातील अडगळ, जुन्या विटा, दगड या ठिकाणी बेडूक, उंदीर आश्रय घेतात. त्यामुळे अडगळ, जुन्या विटा ठेवू नका. घराच्या आवारात वाढलेल्या गवतामुळे साप येतात. गवत वाढत असल्याने सर्पदंशाच्या घटना वाढतात. त्यामुळे गवत काढावे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने उपचारासाठी मुबलक औषधसाठा उपलब्ध केला आहे. विषारी साप चावल्यानंतर लागणाऱ्या सर्व औषधांचा यात समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. मात्र, पावसाळ्यात सर्पदंशाचा अधिक धोका असल्याने अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे.
पावसाळा सुरू होण्याच्या काळात काही जातीच्या सापांचा प्रजननाचा काळ असतो. बिळांमध्ये पाणी साचल्याने साप सुरक्षित जागेच्या शोधात असतात. त्यामुळे जून ते ऑगस्ट या कालावधीत ते मानवी वस्तीत आढळतात. तसेच उंदीर, बेडूक हे त्यांचे आवडते खाद्य आहे. पावसाळ्यात बेडूकही दीर्घनिद्रेतून बाहेर आलेले असतात. त्या खाद्यांसाठीही साप बाहेर पडतात. या काळात साप आढळल्यास घाबरून न जाता सर्पमित्रांना कळवावे.