Site icon Tufan Kranti

घटस्फोट

भारतीय संस्कृतीत विवाहाला एक पवित्र बंधन मानलं जातं.एकदा बांधलेली लग्नाची गाठ सात जन्म सुटत नसते असे आपल्या हिंदू संस्कृतीत मानले जाते.म्हणजेच काय की विवाहाचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे.हल्ली मात्र घटस्फोटाचे प्रमाण समाजात वाढत चालले आहे.याला अनेक कारणे आहेत…जसे जीवन पध्दतीत झालेला बदल, एकमेकांच्या विचारांशी न जुळणे, मूलबाळ नसणे,नव-याकडून किंवा बायकोकडून केल्या जाणारा मानसिक किंवा शारीरिक छळ इत्यादी.
        आपले नाते संपावे असे मुद्दाम कोणाला वाटत नाही.त्यासाठी नवराबायकोचं नातं निकोप असणे गरजेचे आहे.एकमेकांमध्ये सामंजस्य असल्याशिवाय विवाहाचे पवित्र बंधन टिकू शकत नाही.घटस्फोटामुळे जरी नवराबायकोचं नातं संपुष्टात आलं तरी त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहतात.विशेषत: स्त्रियांना घटस्फोटीत म्हणून जगताना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो.जर स्त्री कमावती नसेल तर हे प्रश्न अधिकच बिकट होतात.घटस्फोटानंतर एखाद्या स्त्रीने पुनर्विवाह करायचा ठरवलं तरी तिच्याशी लग्न करायला कोणीही सहजासहजी तयार होत नाही.शिवाय तिला जर मुलेबाळे असतील तर अजूनच पुनर्विवाह होणे कठीण असते.समाजाचा अशा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित असतो.मुलांचा होणारा सावत्र बाप कसा निघेल ही समस्याही स्त्रिला सतावीत असते.मानसिक प्रश्नांसोबतच सामाजिक, लैंगिक प्रश्नही निर्माण होतात.सध्या काही संस्था अस्तित्वात आहेत ज्या लग्नानंतर कसे वागावे याचे शिक्षण देत असतात.पण खरंच या संस्थांद्वारे शिकवण मिळवून आपण आपले संपूर्ण आयुष्य जगू शकतो का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.घटस्फोटाने जीवनातील प्रश्न सुटत नाही.विवाहाचे बंधन टिकविण्यासाठी नवरा -बायकोने सामंजस्य दाखवून हे नाते टिकवून ठेवणे आवश्यक आहे.नवीन लग्न होऊन घरी आलेल्या नववधूकडून लगेच घरच्या सर्वांशी जुळवून घेण्याची घाई करू नये.तिला थोडा वेळ द्यावा.वडिलधा-या लोकांनी नवीन जोडप्यामध्ये गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करायला हवा.
       कधीकधी परिस्थिती बिकट होते.नवरा-बायकोपैकी कुणीच माघार घ्यायला तयार नसेल तर अशा परिस्थितीत घटस्फोट घेणे सोयीचे होते. ग्रामीण भागातील घटस्फोट घेणा-या स्त्रियांचे प्रमाण आजही अतिशय कमी आहे.परंतु घटस्फोट शक्यतो होऊ नये यासाठी न्यायव्यवस्था प्रयत्नशील असतात.विवाहीत जोडपे जर वादावादी करत असतील तर त्यांच्यात नक्कीच दुरावा निर्माण होतो.जर नवरा -बायकोपैकी कुणी व्यभिचार करत असेल तर हे कारणही घटस्फोटासाठी कारणीभूत ठरू शकते.नव-याने बायकोला किंवा बायकोने नव-याला मारहाण करणे,शिविगाळ करणे हे देखील नवराबायकोतील संबंध संपवण्यास कारणीभूत ठरू शकते.स्त्रीने पुनर्विवाह करणे किंवा घटस्फोट घेणे आजही चांगले मानले जात नाही.विवाह एक धार्मिक संस्कार आहे.या संस्काराने निर्माण झालेले संबंध टिकवून ठेवणे नवरा -बायको दोघांचीही जबाबदारी आहे.छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे सर्वात चांगले.कुणीही या जगात परिपूर्ण नाही.जे आहे त्यात समाधानी असणे फार गरजेचे आहे.नाहीतर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही.
                लैलेशा भुरे
Exit mobile version