सांगोला :
सांगोला तालुक्यातील प्रमुख समाज असलेल्या लोणारी समाजाचे समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक आणि लोणारी समाजातील समाज बांधवांसाठी सांगोला शहरात भव्य असे लोणारी भवन उभारण्यासाठी राज्य सरकारने ५ कोटी रुपयांची तरतूद करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
सांगोला तालुक्यातील अत्यंत प्रामाणिक आणि कष्टकरी समाज म्हणून लोणारी समाज अनेक वर्ष समाज व्यवस्थेत गुण्यागोविंदाने नांदत आहे. या समाजातील समाज बांधवांनी नेहमीच आज पर्यंत इतरांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. या समाजाने आजवर कधीच स्वतःसाठी काही मागितले नाही प्रथमच या समाजाने सांगोला शहरात समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक आणि लोणारी समाजातील घटकांसाठी लोणारी भवन उभा करावे तसेच समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका असावी अशी मागणी केली आहे. आपल्या मागण्यांसाठी लोणारी समाजातील काही तरुण नुकतेच सांगोला शहरात आमरण उपोषणास बसले होते. लोणारी समाजाच्या मागणीची तीव्रता लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी लोणार समाजाला न्याय मिळावा म्हणून पुढाकार घेतला आहे.
केवळ सांगोला तालुकाच नव्हे तर संपूर्ण मानदेशात संख्येने प्रचंड असणाऱ्या लोणारी समाज बांधवांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या लोणारी समाजासाठी राज्य सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे तसेच समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक व्हावे तसेच सांगोला शहरात भव्य लोणारी समाज भवन आणि समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका बांधावी या प्रमुख मागण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून लोणारी समाज एकवटला आहे. लोणारी समाजाच्या मागण्यांची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी आणि सांगोला शहरात लोणारी समाज बांधवांची अस्मिता अभिमानाने उभा रहावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी स्व. विष्णुपंत दादरे यांचे स्मारक तसेच लोणारी भवन साठी ५ कोटी रुपयांची तरतूद करावी असेही या पत्राद्वारे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नमूद केले आहे.
मागण्या पूर्ण होईपर्यंत लोणारी समाजाच्या पाठीशी ठाम
आजवरच्या राजकीय इतिहासात नेहमीच उपेक्षित राहिलेल्या लोणारी समाजाने प्रथमच स्वतःसाठी काहीतरी मागितले आहे. ज्या समाजाने आजपर्यंत इतरांना देण्याची भूमिका घेतली त्या समाजाला त्यांचा न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी समाज बांधवांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी लोणारी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. लवकरच सांगोला शहरात स्व. विष्णुपंत दादरे यांचे भव्य स्मारक आणि लोणारी भवन उभा राहिल यासाठी मी प्रयत्नशील आहे.
-मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी