५फेब्रुवारी रोजी भव्य सत्याग्रह मोर्चाचे आयोजन!
धर्माबाद ( तालुका प्रतिनिधी )
धर्माबाद- शहर व तालुक्यातील प्रलंबित व वास्तव प्रश्नाच्या संदर्भात आता माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे प्रणित भीमशक्ती संघटना तालुका शाखा धर्माबाद आता रस्त्यावर उतरणार असून विविध वास्तव मागण्यासाठी ५फेब्रुवारी रोजी फुलेनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून भव्य सत्याग्रह मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला देत तशा आशयाचे लेखी निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यासह १८ शासन व प्रशासन कर्त्यांना देण्यात आलेले आहे.
धर्माबाद शहराला लागलेला शाप म्हणजे वन विभागाची जमीन व गायरान जमिनी असून त्या जमिनीवर अनेक शोषित पिडीत कुटुंब कच्ची व पक्की घरे बांधून आपली निवासस्थाने बनवले असून त्या गोष्टीला आता पन्नास वर्षाचा इतिहास आहे! पण आज घडीला ती घरं त्यांच्या अधिकृत मालकीची नाहीत व त्या दिशेने त्यांना मालकी हक्क देण्यासाठी शासन व प्रशासनाने कुठलेच प्रयत्न केलेले नसल्यामुळे त्यांच्यावर सतत टांगती तलवार राहिलेली असते.
शासकीय जमीन, वन जमीन, गायरान जमीन, वक्फ बोर्डाची जमीन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनीवरील अतिक्रमण धारकांचे कब्जे नियमानुसार मालकी हक्कांमध्ये परिवर्तन करावे व जमिनीचे सातबारा त्यांच्या नावे विनाशुल्क करून सरसकट नागरिकांचे पुनर्वसन व पुनर्विकास करावा या प्रमुख मागणी सह पालीत, झोपडीत, रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या बेघर नागरिकांना विनाशुल्क शासकीय गायरान जमिनीचे वाटप करून मालकी द्यावी, भाड्यांच्या घरात राहणाऱ्या भूमीहीन बेघर भाडेकरूंना शासकीय जमिनीचे वाटप करावे व त्यांना मालकी द्यावी, सर्व बेघर अतिक्रमणधारक भूमिहीन कुटुंबांना सरसकट घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी एकूण बजेटच्या किमान 40 टक्के बजेट राखीव करावा, गृहनिर्माण हमी कायदा करावा, गॅस सिलेंडरचे मूल्य सरसकट 450 रुपये निर्धारित करावे, पेट्रोल डिझेलचे वरील उत्पादन शुल्क आणि वॅट 90 टक्के कमी करावे ,वीज आकारणी 70 टक्के कमी करावे व प्रति युनिट किमान दर निश्चित करावे आणि 200 युनिट पर्यंत सरसकट वीज मोफत द्यावी, अतिक्रमण जागेवरील मंदिर, मठ, बौद्ध विहार, पुतळे, स्मारके, मस्जिद ,दर्गाह यांना संरक्षीत करून आरक्षित सार्वजनिक ठिकाणे म्हणून मान्यता द्यावी असे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न भीमशक्ती संघटना आता हाताळणार असून या सर्व मागण्यासाठी पाच फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा फुलेनगर ते तहसील कार्यालय धर्माबाद पर्यंत भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने सत्याग्रह महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व मागणीच्या आशयाचे निवेदन धर्माबाद तहसीलदारां मार्फत शासन व प्रशासनास देताना धर्माबाद भीमशक्ती संघटनेचे कृतिशील तालुका अध्यक्ष शिवराज गायकवाड, शहराध्यक्ष ऍड सोनटक्के आर. व्ही, माधव पांगरीकर, देवके सुरेंद्र, गोस्कुलवाड लिंगन्ना,पत्रकार किशन कांबळे, किरण गजभारे, रामदास पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.