पंढरपुर/प्रतिनिधी:
पहिल्याच पावसात पंढरपुरातील श्रीविठ्ठल मंदिराला गळती लागली असल्याने श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत होत असलेले मंदिर जतन व संवर्धनाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे की काय? असा प्रश्न पडलाय. आम्ही सातत्याने या कामाच्या निकृष्ठ दर्जा बाबत आणि अधिकार्यांच्या हलगर्जीपणाबाबत आवाज उठवत आहोत, आणि या कामाकडे लक्ष ठेवण्यासाठी शासनाने स्वतंत्र अधिकार्यांची नियुक्ती करावी, तसेच पुरातत्व अधिकार्यांच्या देखरेखीखाली सर्व कामे व्हावीत अशी मागणी करत, होत असलेल्या कामाबाबत शंका उपस्थित केली होती. आज आमची शंका खरी ठरली असुन पंढरपुमध्ये काल झालेल्या पावसाचे पाणी मंदिराच्या छतावरुन थेट श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभार्यात येत असुन गाभार्यासह सोळखांबी सभामंडपाच्या छताला गळती लागली असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसुन येत आहे. असे मत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे.
श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम करताना पुरातन कालीन मंदिरांचे काम करणारे कुशल कारागीरांकडुनच हे काम होणे अपेक्षित आहे, तसेच या कामाकडे सातत्याने लक्ष ठेवणारे, पुरातन कालीन मंदिराचा अभ्यास असणारे वास्तुविषारद नेमणे आवश्यक आहे, परंतु तसे काहीच दिसून येत नाही. हे काम सुरु झाल्यापासुन सदर कामाची प्रथमपासुनच आम्ही पाहणी करत आहोत तेंव्हा आमच्या नजरेस कांही गोष्टी आल्या, त्या खटकल्या आणि याबाबत वारंवार आम्ही तक्रारीही केल्या परंतु याकडे मंदिरे समितीचे अधिकारी जाणुनबुजुन दुर्लक्ष करत आहेत. आत्ता पहिल्याच पावसात मंदिराला गळती लागल्याने हे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आमचा संशय बळावला असुन या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी व या सर्व कामासाठी एखादा तज्ञ अधिकारी, पुरातत्व खात्याचे अधिकारी यांची काम पुर्ण होईपर्यंत नियुक्ती करावी, तसेच या कामासाठी शासनाकडून मिळालेला निधी, खर्च झालेला निधी व होऊ घातलेला खर्च याचा ताळेबंदही जाहीर करावा. अशी मागणी आम्ही करत आहोत. अशी माहितीही गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.
गणेश अंकुशराव यांच्यासह पंढरपुरातील अनेकांकडुन सोशल मिडीयावर श्रीविठ्ठल मंदिरातील पावसाच्या पाण्याच्या गळतीबाबत चर्चा सुरु असुन जतन व संवर्धनाच्या कामाबाबत अनेकांकडुन शंका उपस्थित केली जात आहे. या कामाचा दर्जा तपासण्याची गरज सद्यस्थितीत तरी निर्माण झाली आहे.