दै. तुफान क्रांती:
इंदापूर-
संकल्प विजयाचा २०२४ या कार्यक्रमाअंतर्गत सध्या इंदापूरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.निमगाव निमसाखर आणि कळस वालचंदनगर या जिल्हा परिषद गटातील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी मेळावे काल पार पडले.
यावेळी अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या, येणारी २०२४ ची विधानसभा आपण ताकदीने लढवणार आहोत. सध्या प्रत्येक बूथवर काम सुरू आहे. गाव चलो अभियान देखील चांगल्या पद्धतीने पार पडत आहे. बोरी गावात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. युवा मोर्चाचे देखील चांगले काम सध्या सुरू आहे. सध्या इंदापूर तालुक्यात खूपच भयानक परिस्थीती झाली आहे. आपला इंदापूर तालुका २०१४ पर्यंत एक सुसंस्कृत तालुका म्हणून राज्यात ओळखला जात होता, मात्र आज खूप भयानक परिस्थिती आहे. कोणीही शिवीगाळ करत आहे, खालच्या स्थराला जाऊन बोलल जात आहे.
२०१४ च्या आधी तुम्ही कधी हे बघितलं आहे का? आज अनेक युवक भेटून सांगतात तालुक्याची परिस्थिती खूपच बिघडली आहे. ताई आता गुंडाराज हटाव इंदापूर बचाव, आम्ही तालुक्यात फिरून हे सांगणार आहोत, असेही तरुण सांगत आहेत. आज कोणावरही खोट्या केसेस टाकल्या जात आहेत, शिवीगाळ होत आहे. फोन करून तू असच का केल बघतो तुला असं सांगितले जात आहे. हे काय सुरु आहे तालुक्यात? आपणही सत्तेत होतो, मात्र कोणी विरोधात असेल तर त्याला देखील मान सन्मान देत होतो, मात्र सध्याच्या लोकप्रतिनिधींनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत.
या सगळ्या गुंडाराजला आता सगळी जनता वैतागली आहे. सध्या फक्त खोटं बोलायचे निधी आणला रोड केला, मात्र रोडवर २ दिवस सुद्धा डांबर टिकत नाही असा विकास सध्या लोकप्रतिनिधींचा सुरु आहे. रोडला खड्डे पडत असल्यामुळे आज त्याच रोडवर तरुणांचे अपघात होत आहेत. आज छोट्या मुलाला विचारलं तरी ती सांगतो की हा ठेकेदारांचा आमदार आहे, हा जनतेचा आमदार नाही. आपल्याला आता यामध्ये बदल करायचा आहे. इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन भाऊंनी किती संस्था उभ्या केल्या आहेत, यामध्ये ३०-४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, या संस्थेमध्ये ४ ते ५ हजार लोकांना रोजगार दिला आहे. यामध्ये कारखाने असतील शिक्षण संस्था असतील, दूधसंघ असेल. यामुळे आज त्यांचा संसार सुरळीत चालला आहे.
याच निमगाव निमसाखर जिल्हा परिषद गटात आज ४०० ते ५०० कर्मचारी आपल्या संस्थेत काम करत आहेत. आणि हे सर्व जाती धर्माचे आहेत. यामुळे याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. पण या लोकांनी किती लोकांना नोकऱ्या लावल्या? आपल्या तालुक्यातील ५ स्टार एमआयडीसी भाऊंनी १९९९ मध्ये मंजूर करून आणली. त्याठिकाणी आज अनेकांना रोजगार मिळत आहेत. अनेक महिला त्याठिकाणी काम करत आहेत. त्यांनी आज एकही संस्था काढली नाही. त्यामध्ये वेळ न घालवता त्यांनी केवळ ठेकेदारांमध्ये आणि कमिशनमध्ये वेळ घालवला. तुम्ही खालच्या भाषेत बोलत आहेत, येणाऱ्या काळात तुम्ही आमच्याकडुन अपेक्षा करत आहेत, मग असं तुम्ही खालच्या भाषेत जाऊन बोलला तर इथं बसलेली आमची माणसं तुमचे काम करील का? आम्हाला अन्यायाची भाषा सहन होत नाही, आणि मी देखील त्यांना ठाकरे शैलीत उत्तर देऊ शकते. माझे त्यांना एकच सांगणं आहे की पातळी संभाळून बोला. आता जो काही निर्णय असेल तो आपण घेऊ, येणारी विधानसभा आपण ताकदीने लढणार आहोत आणि मोठ्या मताने जिंकणार आहोत, यामुळे तुम्ही कामाला लागा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असेही यावेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले.