दैनिक तुफान क्रांती:
इंदापूर: (दि. २४ फेब्रुवारी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली इंदापुरात भव्य कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या फुटी नंतर प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार इंदापुरात येत असल्याने व थोड्याच दिवसात लोकसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्यात अजित पवार लोकसभा उमेदवाराचे नाव जाहीर करणार का याकडे इंदापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सदर मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर असणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार प्रथमच इंदापुरात येणार असल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या मेळाव्यात विविध प्रश्नावर व अडीअडचणी संदर्भात चर्चा होणार असून येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकी संदर्भात काय रणनीती असणार या विषयावर कार्यकर्त्यांना अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यास हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन इंदापूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी केले आहे.
सदर मेळावा रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता जुनी मार्केट कमिटी, इंदापूर येथे होणार आहे.