चॉकलेटचं आमिष दाखूवन घरी नेलं, चिमुरडीवर अत्याचार; रिक्षा चालकाला १० वर्षांची जन्मठेप
ठाणे सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकाला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या ऑटोरिक्षा चालकाने २०१८ मध्ये एका ८ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले होते. ठाणे सत्र न्यायालयाने काशिमिराच्या पेणकरपाडा येथील एका ऑटोचालकाला २०१८ मध्ये एका ८ वर्षांच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी १० वर्षांची जन्मठेप सुनावली आहे. न्यायाधीश डीएस देशमुख यांनी आरोपी राजेश सिंह यादव याला दोषी ठरवत पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला.आरोपी राजेश सिंह यादव हा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र असल्याचं फिर्यादीत म्हटलं गेलं आहे. १८ नोव्हेंबर २०१८ ला सायंकाळी ५ च्या सुमारास त्याने पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. या घटनेनंतर मुलीने तिच्या आईला हा प्रकार सांगितला आणि आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पीडित मुलगी आणि तिच्या आईसह एकूण नऊ साक्षीदारांनी न्यायालयात साक्ष दिली.
नेमकं प्रकरण काय?
१८ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास. आरोपीने पीडित मुलीला चॉकलेट आणि नारळपाण्याचं आमिष दाखवत घरी नेलं. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जेव्हा मुलगी घरी परतली तेव्हा तिने घडलेला सारा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर घरच्यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपीवर आयपीसी आणि पॉस्को कायद्याच्या कलम ३७६एबी अंतर्गत गुन्हा दाखल केला.