सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर दुष्काळी प्रश्नावर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने पाऊल टाकत उपाययोजना आखायला सुरूवात केली आहे. सध्या जिल्ह्यात पाणी प्रश्नावर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असताना १३७ गावे आणि ९१२ वाड्यांवर राहणारे तीन लाख ७६ हजार ९८७ लोक पाण्याविना तहानलेले आहेत. त्यांच्यासाठी १६७ टँकर वापरून पाणीपुरवठा होत आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यात ४२ लाख ८६ हजारांपेक्षा अधिक पशुधन पाणी आणि चाऱ्यासाठी व्याकूळ झाले आहेत.एकीकडे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान मानल्या जाणाऱ्या उजनी धरणात मागील पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे गेल्या ऑक्टोबरमध्ये ६०.६६ टक्के एवढ्याच पाणीसाठ्यापर्यंत मजल गाठता आली होती. या पाण्याच्या वाटप नियोजनाचेही तीनतेरा वाजल्यामुळे धरणातील पाणीसाठा गेल्या जानेवारीत हिवाळ्यातच मृत पातळीत आला होता. एकूण १२३ टीएमसी क्षमतेपैकी ६३ टीएमसीच्या खाली गेलेला पाणीसाठा मृत किंवा वजा पातळीवर नोंद होतो. वजा पातळीत गेलेल्या पाण्याचा वापर शेती आणि उद्योगासाठी न होता केवळ पिण्यासाठी करण्याचे बंधन आहे. सोलापूरसह पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला भागातील गावांना पिण्यासाठी धरणातून भीमा नदीवाटे पाणी सोडले जाते. त्यासाठी एका वेळेस पाच टीएमसीपेक्षा जास्त पाणी सोडले जाते. सध्या सोलापूर शहरासह पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोल्यासाठी धरणातून पाणी सहा हजार क्युसेक विसर्गाने नदीवाटे सोडले जात असून हे पाणी येत्या २० मे पर्यंत सोलापूरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
सध्या उजनी धरणात केवळ वजा ४४ टक्के म्हणजे जेमतेम ३७.७१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक रहिला आहे. येत्या २० मेपर्यंत या पाणीसाठ्यात आणखी मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या जूनमध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यास धरणातील पाण्याची परिस्थिती चिंताजनक राहण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर भेडसावत असताना जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीत गढून गेले होते. निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईवर उपययोजना करण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला सुरूवात केली तरी ग्रामीण भागात पाणी आणि मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. करमाळा तालुक्यात सर्वाधिक एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या ३९ गावे आणि २६१ वाड्या-वस्त्यांना ४३ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. तर सांगोला तालुक्यात २८ गावे आणि २३५ वाड्यांतील ६८ हजार ६०० लोकांसाठी ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. माढा तालुक्यात १५ गावे आणि ११ वाड्यांवरील तहानलेल्या ५१ हजार ८४४ लोकांना १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मंगळवेढ्यात १६ गावे आणि २५५ वाड्या-वस्त्यांवरील ४० हजारांहून अधिक खेडुतांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, त्यासाठी प्रशासनाकडून २२ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. माळशिरस तालुक्यात ३६ हजार २५१ लोकसंख्येच्या १८ गावे आणि १८५ वाड्यांची तहान भागविण्यासाठी १८ टँकर वापरले जात आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात मुक्या पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न भेडसावत असून ४२ लाख ८६ हजार ९९८ एवढ्या पशुधनावर संकट ओढवले आहे. येत्या जूनपर्यंत पुरेल एवढा चारा निर्माण करण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांना चारा बियाणे वाटप करण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.