अर्थ संकल्प मांडणी व बूथ कार्य योजनेच्या अनुषंगाने सांगोल्यात पदाधिकारी बैठक संपन्न
सांगोला:
केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी राबविलेल्या योजना सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचविल्या पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दहा वर्षातील क्रांतीकारी कार्य पुन्हा एकदा आपल्याला जनतेसमोर न्यायचे आहे. राज्याच्या अर्थसंकल्पा मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकरी, महिला, शिक्षण, या विषयी घेतलेले जे योग्य निर्णय आहेत. ते कार्यकर्त्यांनी तळागाळातील सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचविले पाहिजेत . विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. कार्यकर्त्यांनी जागरूक राहून काम करावे. भारतीय जनता पक्षाला मजबूत करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बूथ रचना मजबूत करण्याची आवश्यकता आहे. सक्षम कार्यकर्ता हीच भाजपची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
अर्थ संकल्प मांडणी व बूथ कार्यरचना या योजनेच्या अनुषंगाने सांगोल्यात पदाधिकारी बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर, उत्तर मंडल अध्यक्ष अतुल पवार, दक्षिण मंडल अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, बूथ रचना संयोजक लक्ष्मण केंकान, प्रदेश कार्यकारणी सदस्य गजानन भाकरे, लोकसभा विस्तारक अनंत राउत, सरचिटणीस शिवाजी ठोकळे याच्यासह भाजपचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, भाजपची ध्येयधोरणे निश्चित करून कार्यकर्ते सर्व सामान्यांपर्यंत पोहचवत असतात. त्यामुळे कार्यकर्ता हाच पक्षाची खरी ताकद आहे. प्रत्येक बूथची ताकद ५१ टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी बूथ प्रमुखांने कामाला लागावे. भारतीय जनता पक्षाचे पद म्हणजे जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाची जबाबदारी सांभाळताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे. पक्ष संघटन वाढीसाठी मंडल अध्यक्ष व पदाधिकारी यांनी बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख नियुक्ती करताना भाजपचाच असला पाहिजे असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले.