कोर्टी:
तालुका पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” पंधरवड्याचे उद्घाटन पार पडले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे यांनी दिली. वाचनामुळे व्यक्तीला कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक आणि मानसिकदृष्टया परिपक्व होण्यास मदत होते. प्रत्येक पुस्तक माणसाला नवीन कल्पना शिकण्याची संधी देते. पुस्तके वाचल्याने माणसाचे ज्ञान वाढते; अशा प्रकारे, व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. या अनुषंगाने तरुण पिढीला वाचनाकडे वळवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” पंधरवड्याचे आयोजन केले आहे.
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन करून उत्साहाने सहभाग घेतला. यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून विविध विषयांवरील पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली. या पंधरवड्यात वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचक-लेखक संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथाकथन स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डॉ. कैलास करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. अनिल निकम, प्रकाशनचे डीन डॉ. संपत देशमुख, ग्रंथपाल सौ. निशा कारंडे, समन्वयक डॉ. दिपक गणमोटे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.