दैनिक तुफान क्रांती.
इंदापूर :(दि.१६ फेब्रुवारी)
भारतीयांनी आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून,वर्तनातून जगात आपली ओळख निर्माण केली आहे. विश्व कल्याणाची आपण मनोमन करीत असलेली कामना,आपले चारित्र्य, प्रेम,करूणा,सहृदयता, सुसंस्कृतपणा, सहिष्णुता ही आपली खरी ओळख आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते अभय भंडारी यांनी व्यक्त केले.
इंदापूर शहर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने १५ व्या वर्षातील मालोजीराजे व्याख्यानमालेतील “भारतीय संस्कृती व २१ वे शतक” या विषयावर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प त्यांनी गुंफले. शिवप्रतिमेचे पूजन व उद्घाटन सोनाई परिवाराचे युवा उद्योजक प्रवीण माने यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.प्रकाश वाघमोडे हे होते.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून व्यासपीठावर अनुराधा गारटकर,अंकिता पाटील-ठाकरे,भरत शहा, अलका ताटे,डॉ.कल्पना खाडे उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना अभय भंडारी म्हणाले की आपल्या देशातील विविध राज्यात असणाऱ्या वेगवेगळ्या भाषा,वेगवेगळे पोशाख,वेगवेगळ्या आहार पद्धती,असंख्य प्रकारच्या पूजा पद्धती,धर्म संकल्पना,अगदी वेगळी जीवनशैली, हे सारे भिन्न भिन्न असूनही परस्परांमधील वैविध्यपूर्ण आचार, विचार, आहार, भाषा, धर्मश्रद्धेचा आदर करणे या विविधतेमागील एकतेवर दृढ विश्वास असणे ही आपली खरी भारतीय संस्कृतीची ओळख आहे. आपली प्राचीन सभ्यता,संस्कृती,अध्यात्मविद्ये चा आणि हिंदू धर्माचा सारांश असलेली श्रीमद भगवदगीता ही आपली ओळख आहे.
रशिया ,युक्रेन मध्ये भयंकर युद्ध सुरू असताना हे युद्ध समाधानकारक शांतीवार्ता करून थांबविण्यासाठी दोन्ही देशांचे राष्ट्रप्रमुख भारतीय पंतप्रधानांशी दीर्घ चर्चा करतात, त्यामागील विश्वास ही आपली खरी ओळख जगात निर्माण झालेली आहे. सौदीअरेबिया,येमेन,युद्धात अडकून पडलेल्या जगातील अनेक नागरिकांची तेथून सुटका करण्याचे अभियान भारत सरकारने राबविताना आपल्या विनंतीवरून रोज दोन तास युद्ध विराम होता ही भारताची ओळख निर्माण होत आहे. सारे जग कोरोनाने होरपळत असताना भारताने स्वतःच्या गुणवत्तेने विकसित केलेल्या लशींनी आपल्या कोट्यावधी लोकांना तर वाचवलेच पण त्याशिवाय जगातील अनेक देशांना मानवतावादी दृष्टिकोनातून विनामूल्य पुरवले त्याबद्दल हे जग भारताप्रति कृतज्ञ राहील ही २१ व्या शतकात भारताने आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून जगात ओळख निर्माण केलेली आहे.
मालोजीराजे व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष इंदापूर नगर परिषदेचे माजी गटनेते कैलास कदम यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी तर आभार शरद झोळ यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील गलांडे,योगेश गुंडेकर, अनिकेत साठे ,दत्तराज जामदार ,अमोल खराडे, संदिपान कडवळे,सचिन जगताप यांनी प्रयत्न केले.