विज्ञानामुळे जग जवळ आले आहे असे लहानपणी ऐकले होते ; पण याची खरी प्रचिती फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईटमुळेच आली. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटला आज म्हणजे ४ फेब्रुवारी रोजी २० वर्ष पूर्ण झाली . याचाच अर्थ आज फेसबुकचा विसावा वाढदिवस आहे. आज जगभरात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या दोनशे कोटीहून अधिक आहे. अमेरिकेत माहिती गोळा करणाऱ्या पुस्तकाला फेसबुक असे म्हंटले जाते. अमेरिकेत जेंव्हा डिजिटल युगाची सुरुवात झाली तेंव्हा ही माहिती डिजिटल स्वरूपात आणण्याचे आव्हान मार्क झुकरबर्ग या तरुण मुलाने स्वीकारले. हार्वर्ड विद्यापीठात शिकत असलेल्या मार्कने डस्टिन मॉस्कोविट्स, अँड्र्यूआर्डो सर्विन आणि ख्रिस ह्युजेस या आपल्या मित्रांच्या सोबतीने फेसबुकची स्थापना केली. ४ फेब्रुवारी २००४ रोजी मार्कने हार्वर्ड विद्यापीठाच्या वसतिगृहात फेसबुक सुरू केले. अल्पावधीतच या सोशल नेटवर्किंग साईटने तरुणांना अक्षरशः वेड लावले. फेसबुक आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेटवर्किंग साईट बनली आहे. २० वर्षापूर्वी मार्कने जे रोपटे लावले त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. जगातील जवळपास बारा देशात फेसबुकची कार्यालये आहेत. फेसबुकची आज पाच हजार कोटींची उलाढाल आहे. फेसबुकला मिळणाऱ्या जाहिरातींमुळे फेसबुकला विनामूल्य सेवा देणे शक्य झाले आहे. १८ मे २०१२ ला फेसबुकने आपले शेअर विकायला काढले या शेअर्स ने बाजारात धुमाकूळ घातला. या शेअर्समुळे फेसबुकला कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला. आज फेसबुकने व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम या नेटवर्किंग साईटसना देखील आपल्या कवेत घेतले आहे. फेसबुकची वाढती लोकप्रियता पाहून गुगलने फेसबुक विकत घेण्याचा प्रस्ताव मार्क झुकरबर्ग समोर ठेवला मात्र त्याने तो फेटाळून लावला. इंटरनेट विश्वात गुगल नंतर सर्वात जास्त विजिट होणारी वेबसाईट आहे. आजच्या युगात फेसबुक हा तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. फेसबुक निर्मितीचे एकमेकांशी संवाद साधने, मतप्रदर्शन आणि देवाणघेवाण हे मुख्य उद्देश होते व आजही कायम आहेत. यासोबतच नवनवीन फीचर्स फेसबुक वापरकर्त्यांसाठी आणते. फेसबुक आज अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. फेसबुकवर एका वापर कर्त्याचे सरासरी पाचशे मित्र आहेत तो दररोज दहा लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो किंवा स्वीकारतो फेसबुकवर आज इतके युजर्स आहेत की त्या सर्वांचे एक कुटुंब करायचे म्हटलं तर त्या कुटुंबाची लोकसंख्या जगातील कोणत्याही देशातील लोकसंख्येपेक्षा अधिक असेल. हे विश्वची माझे घर…. या उक्तीप्रमाणे संपूर्ण विश्वाला एक कुटुंब बनवण्याचे काम फेसबुकने केले आहे. फेसबुकला २० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे