सांगोला:
सांगोला तालुक्याच्या दुष्काळी पश्चिम भागातील बागलवाडी येथे दादासाहेब मनोहर चळेकर या तरुण मतदाराने ज्वलनशील पदार्थ टाकून ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित अधिकाऱ्यांनी तातडीने मशिनवर पाणी ओतून आग आटोक्यात आणली, त्यामुळे मशीनचे नुकसान टळले आहे. दादासाहेब चळेकर हा अंतरावली सराटीतील लाठीहल्याचा प्रकार, तसेच पाणी आणि चार टंचाईचा वारंवार उल्लेख करत आहे, त्यामुळे त्याने हे कृत का केले, हे निष्पन्न होऊ शकले नाही.
दरम्यान, उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने ईव्हीएम मशीनचे नुकसान टळले आहे. ते ईव्हीम मशिन सुस्थितीत आहे. मात्र, कोणताही धोका नको; म्हणून बागलवाडी केंद्रावर तातडीने नवे मशिन बसविण्यात आले आहे. त्या मशिनवर पुढील मतदान सुरळीतपणे सुरू आहे.
सांगोला (Sangola) तालुक्यातील बागलवाडी येथे दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. दादासाहेब मनोहर चळेकर हा मतदानासाठी आला. मतदारयादीतील नावाची पडताळणी पाहून त्याला कर्मचाऱ्यांनी मतदानासाठी पुढे पाठवले. मात्र, त्याने मतदानाच्या ईव्हीएम मशीनवर (Evm machine)ज्वलनशील पदार्थ टाकून ते पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित कर्मचाऱ्यांनी मशिनवर तातडीने पाणी ओतून आग ओटाक्यात आणली. त्यामुळे मशीनचे नुकसान टळले आहे.
दरम्यान, हा प्रकार घडेपर्यंत त्या मशिनवर 410 मतदान झाले होते. पण कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे ते मशिन सुस्थितीत आहेत. व्हीव्हीपॅटच्या स्लिपाही व्यवस्थित आहेत. मशीन सुस्थितीत आहे. मात्र, कोणताही धोका नको; म्हणून त्या केंद्रावर नवीन ईव्हीएम मशीन बसविण्यात आले आहे. त्या मशीनवर पुढील मतदान सुरळीतपणे सुरू आहे. दादासाहेब मनोहर चळेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे मशीन पेटविण्याबाबत चौकशी केली असता तो अंतरवाली सराटीतील लाठीहल्ल्याची घटना, पाणी आणि चारा टंचाई अशी वेगवेगळी कारणे देत आहे. तो थोडी बडबड करत आहे, त्यामुळे त्याने काही उत्तेजक द्रव्य घेतले आहे का, याचीही तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. या प्रकरणी पोलिस चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबविणार आहेत.