दै. तुफान क्रांती/इंदापूर:
गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी इंदापूर येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने पैगंबर जयंतीच्या निमित्ताने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी चांद-तारा मस्जिद कसबा येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत इंदापूर शहरासह परिसरातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.अबाल वृद्धां बरोबरच लहान मुले,मुली व तरुण पारंपारिक वेशात सहभागी झाले होते.त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. हातात पैगंबर साहेबांच्या सुविचारांचे फलक, विविध रंगांचे झेंडे, सर्वधर्मीय एकतेचा संदेश देणारे शायरी चे फलक घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने कसबा येथुन सुरू झालेली मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.कसबा येथून निघालेली मिरवणूक नेहरू चौक,मेन रोड,छत्रपती शिवाजी महाराज चौक, (खडकपुरा) वेंकटेश नगर, बाबा चौक,हायवे,शेख मोहल्ला,माळी गल्ली,बागवान मोहल्ला मार्गे दर्गा मस्जिद चौक येथे आली.या ठिकाणी दर्गा मस्जिद मध्ये समारोप करण्यात आला.मिरवणूक मार्गावर चौकात व अनेक ठिकाणी विविध संघटना,ग्रुप तसेच विविध मान्यवरांनी मिठाई,सरबत वाटप, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.चांदतारा ग्रुप कसबा, इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती,तेज पृथ्वी ग्रुप,अंजुमन रजा ए मुस्तफा गृप, अहमद रजा गृप,ए पी कंपनी,इंदापूर शहर बागवान जमात, मौलाना आझाद चौक गृप, ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रतिष्ठान तसेच दर्गा मध्ये चौक या ठिकाणी विविध मान्यवरांनी स्वागत केले.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच सोनाई परिवाराचे कार्यकारी संचालक अतुलशेठ माने यांनी दर्गा येथे भेट देत दर्शन घेतले.तसेच सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.मिरवणूक मार्गावर सर्वश्री भरतशेठ शहा, महारूद्र पाटील, कैलास कदम, प्रा.कृष्णाजी ताटे सर, तेज पृथ्वी ग्रुप च्या संस्थापक अध्यक्षा अनिता ताई खरात, वंचित आघाडी चे सुभाष खरे,उमेश मखरे इत्यादी मान्यवरांनी स्वागत केले.एच के जी एन ग्रुप व इंदापूर शहर बागवान जमात यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.याची सुरूवात इंदापूर चे तहसीलदार बनसोडे, पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे,भरतशेठ शहा, अनिता ताई खरात इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.सर्व सहभागींना फळे व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.मिरवणूकी साठी इंदापूर पोलिस स्टेशन चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मिरवणुक शांततेत पार पडली.इंदापूर मुस्लिम जमातच्या वतीने दर्गा मस्जिद या ठिकाणी सर्व उपस्थितांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
इंदापूर या ठिकाणी गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी मिरवणुकीचे व पैगंबर जयंती चे आयोजन करण्यात आले होते.गणेशोत्सव असल्यामुळे दोन दिवसानंतर आयोजन करण्यात आले.प्रशासनाला सहकार्य करण्याच्या साठी मुस्लिम समाजाने गणपती विसर्जनानंतर मिरवणूकीचे आयोजन केले.गुरुवार या दिवशी विद्युत मंडळाने विद्युत पुरवठा चालू ठेवून सहकार्य करणे अपेक्षित होते.परंतु लोड शेडिंग च्या नावाखाली इंदापुरात विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सरबत,आईस्क्रीम,पाणी इत्यादी पदार्थ ठेवण्यात आले होते.विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे थंड पदार्थांवर परिणाम होत होता. त्याचप्रमाणे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्या ठिकाणी अडचणी येत होत्या. त्यातच मस्जिद परिसरातील पाण्याच्या मोटारी बंद झाल्याने हजारो नागरिकांच्या अडचणीत भर पडली. प्रशासनाशी तथा एम एस ई बी च्या वरिष्ठांशी विद्युत पुरवठा चालू करण्यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्याचप्रमाणे मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे मुस्लिम बांधवांनी तथा उपस्थित सर्व धर्मीय मान्यवरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.