Site icon Tufan Kranti

मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

वाणीचिंचाळे परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर; घरे, फळबागा यांचे लाखो रुपयांचे नुकसान* 
सांगोला : 
वाणीचिंचाळे ता.सांगोला येथे काल दि.19 रोजी रात्री वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत अनेक कुटुंबांच्या घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष फळबागा व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी महावितरणाच्या विजेचे  पोल जमिनीवर पडून तर विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. नुकसानग्रस्त परिवाराची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी तात्काळ  तहसीलदार संतोष कणसे, तलाठी राजवाडे, कृषी सहाय्यक नागेश सरगर, यांना याबाबत माहिती देत नुकसानग्रस्त नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना  तातडीची शासकीय मदत जाहीर करण्यास सूचना दिल्या.
        शुक्रवार दि.19 रोजी सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे वाणीचिंचाळे व परिसरातील जवळपास 60 ते 70 कुटुंबीयांच्या घरांची पडझड झाली. घरावरील पत्रे आणि कौले उडून गेल्याने भिंती पडल्याने परिसरातील अनेकांचे संसार उघड्यावर आले तर या भागातील सुखदेव घुणे, रामलिंग पाटील, दादासाहेब घुणे ,गणेश जाधव, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षांच्या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या फळबागांच्या विक्रीचे व्यवहार सुद्धा झाले होते. अशा प्रकारे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान कोलमडले आहे. यावेळी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही .या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याची प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी जेष्ठ नेते लक्ष्मण निळे, शिवाजी कर्वे ,बाबुराव सोपे, सरपंच जितेंद्र गडहिरे ,राजेंद्र पवार, दादासाहेब घुणे,सुखदेव घुणे, शकलाल शेख यांचे सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
 वादळी वाऱ्यामुळे वाणीचिंचाळे आणि परिसरात घरांचे व फळबागांचे अतोनात नुकसान झालेले  बघून मन खिन्न झाले. हे उघड्यावर पडलेले संसार पुन्हा उभा करण्यासाठी या परिवारांना मी भेट दिली आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना दिल्या.
 -मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील
*(जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.)
Exit mobile version