हातात मशाल घेवून दिपकआबांची जवळा गावात रॉयल एन्ट्री
सांगोला:
दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यापासून संपूर्ण सांगोला विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य संचारले आहे. एवढी वर्षे इतरांसाठी काम केले. आता दीपकआबांना विजयी करायचे या ईर्षेने कार्यकर्ते पेटले आहेत. कोणत्याही परिस्थितीत दीपकआबांना आमदार करून विधानसभेत पाठवण्याचा निर्धार करत दीपकआबांनी आतापर्यंत केलेली कामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही देत जवळा व आसपासच्या वाड्यावरस्त्यावरील नागरिकांनी दीपक आबांच्या प्रचारासाठी २७ लाख रुपयांची वर्गणी जाहीर केली.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रथमच दीपकआबा साळुंखे पाटील यांनी हाती मशाल घेऊन जवळा गावात रॉयल एन्ट्री केली. त्यांच्या स्वागताला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. दीपकआबांना खांद्यावर उचलून घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावातून मिरवणूक काढली. दुपारपासूनच वाड्या वस्त्यावरील कार्यकर्ते जवळा गावात गर्दी करू लागले होते. सायंकाळी दीपकआबा साळुंखे पाटील यांचे जवळा गावात आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गावाच्या वेशीपासून त्यांच्या स्वागत मिरवणुकीला सुरुवात झाली. हलगीच्या कडकडाटात, फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले. एकच वादा दीपकआबा या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दीपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल चिन्ह घेवून उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जवळा गावात पहिल्यांदा आल्यानंतर ग्रामस्थांचे प्रेम, सत्कार पाहून मी भारावून गेलो आहे. देशाचे नेते शरद पवारांच्या आदेशानुसार शेकापचे ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव देशमुख यांना मदत केली. गावभेट दौऱ्यावेळी तालुक्यातील गावे, वाड्यावस्त्यांवर फिरत असताना नागरिकांनी, आबा तुम्ही जनतेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी असे सांगितले. गेल्या पाच वर्षांपूर्वी शहाजीबापूंना आमदार करण्यासाठी मदत केली. गेल्या ४० वर्षात निरपेक्ष भावनेने सर्वांना मदत केली. तळागाळातील प्रत्येक घटकातील लोकांना सोबत घेऊन काम केले. जनतेच्या दरबारात तुम्हाला मतदान करण्याची संधी आम्हाला द्या, अशी हाक जनतेने दिली. जनतेच्या आशीर्वादावरच जनतेचा उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पहिली उमेदवारी सांगोला मतदारसंघातून माझी जाहीर केली. त्यामुळे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन दीपकआबा साळुंखे पाटील यांनी केले. यावेळी जवळा, घेरडी, भोपसेवाडी, तरंगेवाडी, आगलावेवाडी, बुरंगेवाडी, डिकसळ, पारे या गावातील, वाड्यावर त्यांवरील हजारो कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.