दिपकआबांची अजितदादाकडे आग्रही मागणी ; अजितदादांचा सकारात्मक प्रतिसाद
सांगोला:
स्त्री शिक्षणाच्या जनक, थोर समाजसेविका आणि देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि थोर समाजसुधारक बहुजनांची पोर शिकली पाहिजेत हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारे शिक्षणमहर्षी, जातीय निर्मूलनासाठी आयुष्यभर झटणारे महात्मा ज्योतिबा फुले या दोघांचा सांगोला शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभा करण्यासाठी आणि क्रांतीज्योती भवनसाठी महाराष्ट्र सरकारने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सांगोला शहर आणि तालुक्यात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी व सत्यशोधक विचारांवर प्रेम करणारा मोठा समुदाय आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी फुले दांपत्याचा पूर्णाकृती पुतळा व दोघांच्या नावे क्रांतीज्योती भवन निर्माण व्हावे ही या समुदायाची अनेक वर्षांची आग्रहाची मागणी आहे. याच मागणीची दखल घेत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली आणि सांगोला शहर आणि तालुक्यातील जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि अस्मितेच्या विषयांवर मार्ग काढण्याची विनंती केली. सांगोला तालुक्यातील जनतेच्या भावनेचा आदर करून राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिपकआबांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरात लवकर सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे भव्य स्मारक आणि क्रांतीज्योती भवन निर्माण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असेही यावेळी अजितदादा पवार यांनी सांगितले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.