विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवरची महत्वाची भेट
सांगोला:
महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख व शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी मंगळवारी रात्री अकलूज येथे उशिरा सदिच्छा भेट घेत आगामी विधानसभा निवडणूकांसाठी त्यांचे आशिर्वाद घेतले.
सांगोला विधानसभा मतदार संघातून शेतकरी कामगार पक्षाकडून डॉ.बाबसाहेब देशमुख यांची उमेदवारी निश्चित होऊन विधानसभा मतदार संघातील नेतेमंडळी त्यांच्या प्रचारास लागले आहेत.स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात आता नातवासाठी मोहिते पाटील परिवार कोणती भूमिका घेणार ? हे मात्र विधानसभेच्या धामधूमीतच समजणार आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबीय आणि मोहिते पाटील कुटुंबिय एक झाले तर नवल वाटायला नको, अशीही चर्चा आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या राजकारणात 50 वर्षे आमदारकीची कारकीर्द गाजवणारे गणपतराव देशमुख यांची पुढील पिढी आता राजकारणात पाऊल ठेवत आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांनी विधानसभा लढवली होती. मात्र त्यावेळी डॉ.अनिकेत यांचा निसटता पराभव झाला. यानंतर आता गणपतराव देशमुख यांचे दुसरे नातू बाबासाहेब देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शेकाप पक्षाच्या वतीने बाबासाहेब देशमुख यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी सांगोला विधानसभा मतदारसंघात केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आबासाहेबांच्या दोन्ही नातूंनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. येणारी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे याच हेतूने देशमुख बंधूंची रणनीती सुरू आहे. त्याच धर्तीवर विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेण्यात आली असून या भेटीमागचं कारण कळलं नाही, मात्र सदिच्छा भेट असल्याचं डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांनी म्हटलं आहे. शेकापचे नेते डॉ.बाबसाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं असून, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.