घटनेची माहिती कळताच शेकाप नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली
सांगोला:
शेतात मजुरीचे काम आटोपून गावाकडे परत जाण्यासाठी एसटी बसची वाट पाहात रस्त्याच्या कडे थांबलेल्या महिला शेतमजुरांना भरधाव वेगातील १४ चाकी मालमोटारीची जोराची धडक बसून घडलेल्या भीषण अपघातात सहा महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला. पंढरपूर-कराड रस्त्यावर सांगोला तालुक्यातील चिकमहूदजवळ मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला.
या अपघातातील अश्विनी शंकर सोनार वय 31, इंदुबाई बाबा इरकर वय 50, कमल यलाप्पा बंडगर वय 48, सुलोचना रामचंद्र भोसले वय 42, श्रीमंती सदाशिव माने वय 43, भिमाबाई जाधव वय 45 यांचा जागीच मृत्यू झाला. मनीषा आदिनाथ पंडित वय 32 जखमी… (सिंधुबाई रघुनाथ खरात वय 48 मीताबाई दत्तात्रय बंडगर वय ४८) जखमी जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या सर्व महिला शेतमजुरी करून घराच्या संसाराचा गाडा ओढत होत्या. नेहमीप्रमाणे सकाळी चिकमहूद येथील एका शेतकऱ्याच्या शेतात पीक पेरणीच्या कामासाठी गेल्या होत्या. दुपारी उशिरा शेतातील काम आटोपून आपल्यागावी कटफळ येथे परत जाण्यासाठी या महिला रस्त्याच्या कडेला एसटी बसची वाट पाहात थांबल्या होत्या. परंतु पंढरपूरहून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका १४ चाकी मालमोटारीने सर्व महिलांना जोरात ठोकरले. चालकाचा ताबा सुटल्यामुळे मालमोटार महिलांमध्ये घुसली.
या अपघातात काही महिला मालमोटारीच्या दोन्ही बाजूच्या चाकांखाली चिरडल्या. सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन महिला जखमी झाल्या असून त्यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघात घडताच जोराचा आवाज येऊन गोंधळ उडाला. स्थानिक तरूणांच्या जमावाने मदतकार्य हाती घेतले. मालमोटारचालकाला जागेवर पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदळे यांनी अपघातस्थळी भेट देऊन निरीक्षण नोंदविले.