सांगोला नगरपरिषद संचलित डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अभ्यासिकेचे उदघाटन सांगोला तालुक्याचे आमदार ऍड. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते पार पडले. सदर उदघाट्न प्रसंगी आमदार शहाजीबापू पाटील यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक ते सर्व वाचन साहित्य व इतर सोयी माफक दरात उपलब्ध होतील याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या. तसेच मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनीही गरजू व होतकरू विध्यार्थी यांच्यासाठी या अभ्यासिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहाय्य करण्याची ग्वाही दिली.
सांगोला शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच शालेय अभ्यास करण्यासाठी सांगोला नगरपरिषदेमार्फत सर्व सोयींयुक्त अशी अभ्यासिका ही सांगोला नगरपरिषद मालकीच्या आरक्षण क्रमांक 21 मधील नगरपरिषद कार्यालयासमोरील शॉपिंग सेंटर मध्ये सुरु करण्यात आली आहे. सदर अभ्यासिकेची बैठक क्षमता ही 42 आसनांची असून या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फर्निचरचे स्वतंत्र कप्पे, खुर्च्या, पुस्तके व इतर अभ्यास साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पे करण्यात आले आहेत. ही अभ्यासिका सकाळी 8:00 ते रात्री 10:00 या वेळेत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुरु राहणार असून अभ्यासिकेचे मासिक शुल्क हे प्रति विद्यार्थी 500/- रुपये ठेवण्यात आले आहे. अभ्यासिकेत ऑनलाईन अभ्यासासाठी मोफत इंटरनेट सुविधा देखील पुरविण्यात येणार असून आवश्यक्तेनुसार चार्जिंग पॉईंट बनविण्यात आलेले आहेत.
सदर अभ्यासिका उदघाटनाच्या कार्यक्रमप्रसंगी सांगोला तालुक्याचे आमदार ऍड शहाजीबापू पाटील यांच्या समवेत सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, कार्यालयीन अधीक्षक श्री.स्वप्निल हाके, माजी नगरसेवक श्री.अस्मिर तांबोळी, श्री.अरुण बिले, श्री. आनंद घोंगडे तसेच नगरपरिषदेचे सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
सर्व सोयिंयुक्त अशी अभ्यासिका स्पर्धा परीक्षा तसेच शालेय विद्यार्थी यांच्यासाठी सुरु करण्यात आली असून आवश्यकतेनुसार इतर ही सुविधा अभ्यासिकेत पुरविण्यात येतील. अभ्यासिकेची आसन क्षमता ही मर्यादित असल्याने गरजू विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश सुनिश्चित करावा.
मुख्याधिकारी
नगरपरिषद सांगोला