भाळवणी:
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील भाळवणी पिराची कुरवली फाटा या रस्त्यावरील काका म्हेत्रे यांच्या शेतामध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्यामुळे या परिसरातील नागरिक घाबरलेले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की काका म्हेत्रे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात संध्याकाळी आपल्या चार चाकी वाहनातून जात होते. मुख्य रस्त्याकडून शेतात वळत असताना समोरच बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने चार चाकी वाहनातील सर्वजण घाबरले. त्यांनी आसपासच्या वस्तीवर फोन करून परिसरातील नागरिकांना घटनास्थळी बोलवले आणि घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच साखर कारखाने सुरू होत असल्यामुळे ऊसतोड कामगार परिसरात राहण्यासाठी येत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वाढले आहे. रात्री शेतातील लोकांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहे. त्याकरिता वनविभागाने योग्य ती कारवाई करून बिबट्या सदृश्य प्राण्याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिक,शेतकरी करत आहेत.
यावेळी प्रत्यक्षदर्शी काका म्हेत्रे म्हणाले या परिसरात गेली अनेक दिवस बिबट्या सदृश्य प्राणी आहे. असे ऐकून होतो परंतु कालच मला समोर बिबट्या दिसल्याने हा बिबट्या सदृश्य प्राणी असल्याची खात्री झाली.यावर वन विभागाने तात्काळ कारवाई करावी. यावेळी जयराम शिंदे म्हणाले की वन विभाग कोणतीही कारवाई करत नाही.हा विभाग वेळीच बंदोबस्त करत नाही.घटना घडल्या नंतर 24 तासांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी करतात.मात्र कोणतेही उपाय योजना करीत नाहीत.वन विभागाने आम्हाला परवानगी द्यावी आम्ही बिबटयाचा बंदोबस्त करतो. यावेळी प्रभारी वन अधिकारी कल्पना पांढरे म्हणाल्या,आपल्या मागण्या आम्ही वरिष्ठ अधिकारी यांना सांगतो.तोपर्यंत आपण व आपल्या परिसरातील नागरिक,शेतकरी यांनी शक्यतो रात्री फिरणे टाळावे.हातात बॅटरी,काठी घेऊन बाहेर पडावे.फटाके वाजवावेत.लहान मुले बाहेर सोडू नयेत.लहान जनावरे बंदिस्त जागेत बांधावीत.अशा प्रकारे काळजी घ्यावी.