गडब:
जिल्ह्यातील पेण येथे न्यायालयात कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद करू नये यासाठी विशेष सहाय्यक अभियोक्ता अॅड. दिनेश जनार्दन पाटील (प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, कोर्ट. क्र. 1, ता. पेण, जिल्हा – रायगड) यास दहा हजार रुपयाची लाच घेताना नवी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करीत ताब्यात घेतले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, यामधील तक्रारदार व त्यांचा मित्र यांचे विरोधात पेण पोलीस ठाणे, रायगड येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचे दोषारोप पत्र सदर न्यायालयात दाखल असून सदर गुन्ह्याचे अनुषंगाने तक्रारदार आणि त्यांचा मित्र यांनी संबंधित न्यायालयात डिस्चार्ज अर्ज दाखल केला. त्या अर्जावरील सरकारी अभियोक्ता यांचा (म्हणणे) सादर केल्याबाबत व त्याकरिता मदत करण्याकरिता, तसेच तक्रारदार यांनी सीडीआर / एसडीआर व टॉवर लोकेशनचा अहवाल मिळण्यासाठी केलेल्या अर्जात मदत देण्याकरिता तसेच आरोपी विरोधात ठोस युक्तिवाद न करणेकरिता प्रत्येकी रुपये 5000/- अशाप्रकारे एकूण रुपये 10000/- ची मागणी केली असल्याची तक्रार करण्यात आली होती.
सदर तक्रारीचे अनुषंगाने दि. ३/१२/२०२४ रोजी शासकीय पंचासमक्ष केलेल्या लाचेच्या सत्यता पडताळणी दरम्यान यातील लोकसेवक दिनेश पाटील, विशेष सरकारी अभियोक्ता यांनी तक्रारदार यांचेकडे रू. १०,०००/- इतक्या लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निषन्न झाले. त्यानुसार दि. ४/१२/२०२४ रोजी सापळा कारवाई दरम्यान यातील लोकसेवक दिनेश जनार्दन पाटील, विशेष सरकारी अभियोक्ता यांना प्रथम वर्ग न्यायदडांधिकारी, पेण येथील त्यांचे कार्यालयामध्ये मागणी केलेली रक्कम रू. १०,०००/- स्वीकारताना सापळा पथकाने रंगेहात पकडले. आरोपी लोकसेवक अॅड. दिनेश जनार्दन पाटील यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु आहे.सदर कारवाई ही लाचलूचपत प्रतिबंधक विभाग ठाणेचे पोलिस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, गजानन राठोड यांच्या सूचनेनुसार नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक नितीन दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या पथकाने यशस्वी केली आहे.
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.