दैनिक तुफान क्रांती इंदापूर:
हर्षवर्धन पाटील यांच्याकडे कर्तुत्व, विविध क्षेत्राचा अभ्यास व प्रशासनाचा अनुभव आहे. मला राज्यातील सर्वसामान्य लोकांचे जीवनमान बदलायचं आहे, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, त्यासाठी हर्षवर्धन पाटील यांची उपयुक्तता शंभर टक्के आहे. त्याकरिता हर्षवर्धन पाटील यांना तुम्ही विधानसभेत पाठवा, राज्यात पद देण्याची जबाबदारी माझेवर सोपवा, असे आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूर विधानसभा मतदार संघातून हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीवर सोमवारी (दि.७ ) शिक्कामोर्तब केले.
इंदापूर येथे राज्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये प्रवेश सोहळा सोमवारी (दि. ७) संपन्न झाला.यावेळी इंदापूर तालुक्यातील अनेक पदाधिकारी, विविध संस्था, ग्रामपंचायती, सोसायटी, दूध संस्था यांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, महिला यांनीही पक्ष प्रवेश केला. यावेळी अंकिता पाटील ठाकरे, अँड शरद जामदार, राजवर्धन पाटील, लालासाहेब पवार, देवराज जाधव, मुरलीधर निंबाळकर, अँड. कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोड, ऋतुजा पाटील, अलका ताटे आदीसह काही पदाधिकाऱ्यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. यावेळी शरद पवार बोलत होते.
एका निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांनी अस्वस्थतेचे वातावरण निर्माण केले आहे असे हर्षवर्धन पाटील – असे भाषणाच्या प्रारंभी नमूद करीत शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांचे विषयी गौरवोद्गार काढले. अतिशय समाधानाने मी या सभेसाठी आलो आहे. ज्येष्ठ नेते शंकररावभाऊ पाटील हे सन १९६७ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यावर विधिमंडळामध्ये व पुढे मंत्रिमंडळामध्ये माझे मार्गदर्शक होते. तसेच मंत्री म्हणून नेटके काम कसे करावे, याचा आदर्श शंकररावभाऊंनी आंम्हास दिला. भाऊंचा वारसा हर्षवर्धन पाटील पुढे चालवत आहेत.
ते पुढे म्हणाले, मला नेहमी वाटायचे हर्षवर्धन पाटील हे रस्ता चुकले आहेत.त्यांचा आजचा निर्णय हा इंदापूर एवढा मर्यादित नसून राज्याला दिशा देणारा ठरणारा आहे. गेली अनेक दशके वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये हर्षवर्धन पाटील व आम्ही एकत्र काम करीत आहोत. ऊस व साखर उद्योग संदर्भात नेहमी आम्ही एकमताने निर्णय करत आहोत, विचारात कधीही फरक पडला नाही. सहकार क्षेत्रात विश्वासाने नाव घ्यायचे म्हटले तर प्रथम नाव हर्षवर्धन पाटील यांचेच डोळ्यासमोर येते. देशपातळीवरील साखर कारखाना संघटनेमध्ये हर्षवर्धन पाटील प्रमुख म्हणून काम करीत असल्याने येथेही हर्षवर्धन पाटील यांची आम्हास मदत होत आहे, असे भाषणात शरद पवारांनी नमूद केले.
महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, शाहू फुले आंबेडकरांचे विचार, बहुजनांचे विचार राज्यात रुजवण्याचे काम शरद पवार करीत आहे. हर्षवर्धन पाटील यांना आमच्या पक्षात मोठे महत्त्व मिळणार आहे. त्यांना महाराष्ट्रात काम करावे लागेल. इंदापूरचे शिवधनुष्य हर्षवर्धन पाटील यांना पेलायचे आहे. महायुती सरकारमध्ये निधी आणुन २० टक्के कमिशन घेतले जात आहे, अशा या भ्रष्ट सरकारपासून जनतेची सुटका करायची आहे.
हर्षवर्धन पाटील भाषणात म्हणाले, शरद पवार हे देशातील अभ्यासू नेते आहेत, त्यांना सर्व क्षेत्रातील प्रश्नांची जाण आहे. माझे काका शंकररावजी पाटील (भाऊं) यांच्या संस्कारक्षम नेतृत्वातून आंम्ही कार्यकर्ते तयार झालो आहोत. मी पक्ष प्रवेशाचा निर्णय हा व्यक्तिगत घेतलेला निर्णय नसून, इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी घेतला आहे. या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. शरद पवार हे आगामी काळात पक्षांमध्ये जी जबाबदारी देतील ती यशस्वीपणे पार पाडू.
खा.सुप्रिया सुळे भाषणात म्हणाल्या, हर्षवर्धन भाऊ मंत्री असताना इंदापूर तालुक्यात मोठी विकास कामे झाली आहेत. हर्षवर्धन भाऊंना शंकररावजी पाटील यांचा मोठा वारसा लाभला आहे. आजच्या सभेला महिला मोठ्या संख्येने आल्या आहेत. राज्यातील सध्याचे सरकार हे ४० टक्के कमिशन घेणारे सरकार आहे.
खा.अमोल कोल्हे यांनी भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी विजयाची, महाराष्ट्र धर्माची तुतारी हाती घेतल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी भाषणात राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, उत्तमराव जानकर, मधुकर भावे, खा. धर्यशील मोहिते पाटील, अशोक घोगरे, सागर मिसाळ, तालुकाध्यक्ष अँड. तेजसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आ.अशोक पवार, माजी आमदार नारायण पाटील, जिल्हाध्यक्ष जगनाथ शेवाळे, अंकुश काकडे, महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अँड. आशुतोष भोसले यांनी मानले.
इंदापूरची मलिदा गॅंग संपवा – शरद पवार
मी प्रशासनामध्ये काम केले आहे, त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांशी संबंध आहेत. त्यांच्याकडून इंदापूर तालुक्यातील सध्याच्या कारभाराबद्दल मिळालेल्या माहितीवर चर्चा न केलेलीच बरी. अलीकडे काहींनी इंदापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा दिली आहे, अशी टीका विद्यमान आमदारांवर करीत शरद पवारांनी भाषणात इंदापूरची मलिदा गँग संपवा, असा हल्लाबोल केला.
हर्षवर्धन पाटील बारामतीचे जावई आहेत-शरद पवार
हर्षवर्धन पाटील हे बारामतीचे जावई आहेत. त्यांनी ३२ वर्षे संसार चांगला, प्रगतीचा केला आहे. त्यामुळे त्यांना आता महाराष्ट्राचा संसार हा देखील नीट करण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेवर पाठवा, असे नमूद करीत शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांचेकडे राज्यात मोठी जबाबदारी देण्याचे संकेत दिले.