भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांची जोरदार टीका
सांगोला/प्रतिनिधी:
मराठा समाजाच्या नावाखाली मनोज जरांगेनी महाविकास आघाडीची सुपारी घेत राजकीय वरदहस्त मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंची भूमिका, लढा योग्य आहे. त्यावर महायुतीचे सरकार विचाराधीन आहे. पण, मनोज जरांगे हे फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करीत असल्याने जरांगे यांच्या स्क्रिप्टमागे सिल्वर ओकचा अदृश्य हात आहे. त्यामुळे मनोज जरांगेचा लढा मराठा आरक्षणासाठी नसून फक्त फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी असल्याची जोरदार टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी जरांगेंवर टीकास्र सोडले आहे. यावेळी बोलताना चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले की, जरांगे यांनी आमच्या नेतृत्वावर बोलू नये. फडणवीस यांनीच सर्वात आधी मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे, हे संपूर्ण राज्याला माहीत आहे. जरांगे यांच्यामागे सिल्व्हर ओकचा अदृश्य हात असून त्यांचीच स्क्रीप्ट वाचत असल्याचा आरोप चेतनसिंह केदार-सावंत यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांचं राजकारणातलं योगदान आणि त्यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेली भूमिका आणि केलेलं काम यांचा जरांगे पाटलांनी अगोदर अभ्यास करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायदेशीर समिती गठन करून मागासवर्गीय आयोग नेमून त्यांचा अहवाल घेऊन कोर्टामध्ये टिकणारं मराठा आरक्षण दिलेलं आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या भावनांशी खेळ मांडला आहे. त्यांना आता सत्तेची आस लागलेली आहे.
महायुतीच्या सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मकता दाखवली. मात्र, मराठा आरक्षणाचा विषय धगधगत राहून विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कशी मदत होईल, याची काळजी घेण्याचे काम मनोज जरांगे करीत आहेत. मनोज जरांगे हे शरद पवार, उध्दव ठाकरे यांचीच स्क्रिप्ट वाचून जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करीत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केला.