गावभेट दौऱ्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ
सांगोला : तालुका प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवार दि १० रोजी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी लक्ष्मीनगर, अचकदानी, बागलवाडी, सोनलवाडी आणि एखतपुर परिसरातील वाड्यावस्त्यांवर जाऊन हजारो सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला. बुधवार दि १० रोजी एखतपूर ता सांगोला येथे शेकडो महिलांच्या उपस्थितीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्य सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला. यावेळी एखतपूर येथील शेकडो महिलांचे या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले.
गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, स्व आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि स्व ह भ प शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या “सेवा हाच धर्म” या शिकवणी नुसार समाजातील दुर्लक्षित घटकाची सेवा करणे हेच आपले कर्तव्य आहे या भावनेतून गेली ३५ वर्षे जनतेची सेवा करत आहे. जे लोक माझ्यापर्यंत पोहचतात त्यांची तर कामे मी प्राधान्याने करतोच पण जे लोक माझ्यापर्यंत पोहचू शकत नाहीत अशा सर्वसामान्य नागरीक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा गावभेट आणि जनसंवाद दौरा आयोजित केला आहे. जास्तीत जास्त लोकांच्या समस्यांचे निराकरण करून सामान्य लोकांना न्याय कसा मिळेल यासाठीच आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केले.
गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यात असंख्य महिला आणि शेतकऱ्यांनी आपली पेन्शन बंद झाल्याची तक्रार दिपकआबांना सांगितली तसेच अनेकांची वीज विभाग पंचायत समिती तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनला अनेक दिवसापासून रेंगाळलेली कामे मार्गी लावण्याची मागणी गाव खेड्यातील नागरिकांनी आणि शेतात राबणाऱ्या शेतकरी तसेच माय माउलींना माजी आमदार दिपकआबांना केली. यावेळी आबांनीही क्षणाचाही विलंब न करता त्याच ठिकाणावरून सबंधित प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फोन करून सामान्य जनतेची रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने अनेक सामान्य नागरिकांची वर्षानुवर्षे रखडलेली कामे मार्गी लागत असल्याने माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा ग्रामीण भागात चांगलाच सुपरहिट ठरू लागला आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा जाणून घेणारा पहिलाच नेता आम्ही पहिला
आजवर अनेक नेते भाषण आणि मोठमोठी आश्वासने देताना पाहिले. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या व्यथा जाणून घेणारा आणि त्यांच्या समस्या मार्गी लावणारा पहिलाच नेता आपण गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने माजी आमदार दिपकआबांच्या रूपाने पाहिला असल्याची चर्चा ग्रामीण भागातील शेतकऱ्यामधून सुरू आहे.
नागरिकांच्या उत्साहाने दिपकआबाही भारावले.
स्व आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि स्व ह भ प शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी आपल्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यात या आठवणी आवर्जून सांगत साळुंखे पाटील परिवाराशी असलेले नाते किती घट्ट आहे यावर प्रकाश टाकला. वर्षानुवर्षे गाव खेड्यातील नागरिकांनी जपलेल्या आणि जागवलेल्या आठवणीमुळे गावभेट दौऱ्यात दिपकआबाही भारावले असल्याचे चित्र दिसून आले.