दैनिक तुफान क्रांती.
इंदापूर: (दि.४मे)
मागील दोन दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार दौरा करत अक्षरशः इंदापूर तालुका पिंजून काढला. दोन दिवसापूर्वी इंदापूर तालुक्यातील सणसर येथील सभा संपल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या गाडीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांना पुढील प्रवासासाठी गाडीत बसवले. यानंतर स्वतः अजित पवार यांनी या गाडीतील बड्या नेत्यांसोबत सेल्फी काढला आणि तो सेल्फी काही क्षणात राज्यभर व्हायरल झाला.
सोशल मीडिया, वृत्तवाहिन्या अनेक दैनिकांनी या सेल्फी वरती वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या दिल्या.
एकीकडे या सेल्फी च्या बातम्या येत असताना दुसरीकडे इंदापुरात मात्र वेगळे चित्र दिसू लागले.मुळात बडे नेते एका बाजूला अन सर्वसामान्य नागरिक एका बाजूला अशी चर्चा इंदापूर तालुक्यातील नागरिकांमधून होत असतानाच अजित पवार यांची ती सेल्फी व्हायरल झाली.
अजित पवार यांच्या त्या सेल्फी मध्ये हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने, दत्तात्रय भरणे हे दिसत आहेत. या सेल्फी ला उत्तर म्हणून इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी दोन सेल्फी व्हायरल करायला सुरुवात केली. या सेल्फी होत्या सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्या. सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी मध्ये त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. आमदार रोहित पवार यांच्याही सेल्फी मध्ये त्यांच्यासोबत कार्यकर्ते आहे. अजित पवार यांच्या सेल्फी मध्ये बडे नेते आणि सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या सेल्फी मध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत.
अशा या तिन्ही सेल्फी इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून जनता ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडे आहे तर बडे नेते हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे असेच या सेल्फी मधून दाखवण्याचा प्रयत्न इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केलेला आहे. मतदान अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपले आहे.अशातच आता एकीकडे सर्वसामान्य जनता तर दुसरीकडे बडे नेते अशीच रंगत सध्या या निवडणुकीत दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.