आज स्रीया सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत.मग ते शैक्षणिक क्षेत्र असो,वा राजकीय,सामाजिक क्षेत्र असो,वा औद्योगिक.खरं तर यावरुन महिलांचं सक्षमीकरण झालं असं वाटते.साहित्यीक क्षेत्रातही महिला मागे नाहीत.एवढेच नाही तर दहावी बारावीच्या परिक्षेत महिलांना पुरुषवर्गापेक्षा जास्त गुण असतात.त्या पासही जास्त संख्येने होतात.
पुरुष मात्र कोणतेही काम करतांना आळशीपणानं काम करतो.खरं तर त्यांच्या वागण्यात बिभत्सपणा,कुत्सीतपणा,लाचलुचपतबाजी,बदल्याची भावना,स्वार्थी बुद्धी…..ते काम करतांना दिसुन येते.ती बुद्धी या स्रीयांमध्ये दिसत नाही.म्हणुनच शासन या स्रीयांचा इमानीपणा,काम करण्याची हातौटी पाहुन त्यांच्यासाठी विशेष धोरण राबवत असते.स्रीया ज्या ज्या क्षेत्रात पुढे आल्यात.त्यावरुन नाही तर त्यांची झालेली प्रगती पाहुन महिलांना सक्षमीकरणाची गरज नाही असेच वाटते.तरीही महिला सक्षमीकरण काळाची गरज असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
पुरातन काळाचा विचार केला तर गार्गी मैत्रेयी ह्या काय सक्षम नव्हत्या काय?पुरुषांबरोबर रणांगणात जावुन त्या लढत.महाभारतातही विवाह करतांना स्रीने स्वतः पती निवडावा ह्या पद्धतीला वाव होता.त्यासाठीच त्या स्रीयांचे विवाह होतांना स्वयंवर आयोजीत केले जात.हवा तसा पती निवडता यावा हा उद्देश.मग ती गांधारी असो,की द्रोपदी असो,पत्नीच्या इच्छेला विरोध न करता तिची इच्छा, लग्न होताना दिलेले वचन,ह्यातुनच गंगेचं बाळाला पाण्यात टाकणं ह्या गोष्टी महिला सक्षमीकरणच दाखवितात.शकुनीलाही हस्तीनापुरला आणुन आपला सल्लागार बनविणं.हेही गांधारीचं महिला सक्षमीकरणच.मग असे असतांना गांधारीला डोळ्याला पट्टी बांधणे,तसेच भर दरबारात द्रोपदीची इज्जत लुटणे,नव्हे तर ह्या द्रोपदीला तिचा विचार न घेता तिला द्युतात लावणे.ह्या गोष्टीला काय समजावे?रामायणातही कैकेयीचं वचन पाळणारा,समाज दुसरीकडे सीतेलाही वनवासात जायला मजबुर करतो. सीता स्वयंवराचा अधिकार देणारा पुरुषी समाज सीतेला वनवासात पाठवत असतांना का चुप बसला?एवढेच नाही तर स्रीचं पावित्रपण जपणा-या एका पुरुषावर दुसरा पुरुष शिंतोडे उडवतो.ह्या गोष्टीसाठीच महिला सक्षमीकरण ही काळाची गरज ठरली आहे.वरवर महिला सक्षमीकरण वाटत असलं तरी महिला खरंच सक्षम आहे का?हा प्रश्न सर्वांच्या चिंतेचा विषय आहे.आजही महिला सक्षम नाही.केवळ चार दोन महिला सोडल्या तर आजही महिला पुरुषांच्या जोखडात बंदीस्त आहेत.पदोपदी त्यांचा अपमान होतांना दिसत आहे.
८ मार्चला महिला दिन आहे.महिलांना त्यांच्या सक्षमीकरणाची जाणीव करुन देण्यासाठी…..महिलांनी अधिकाराचा उपभोग घ्यावा म्हणुन हा दिवस.पण याच दिवशी एका महिलेवर बलत्कार होतो,कधीकधी खुनही.याला महिला सक्षमीकरण म्हणता येईल काय?
आजही तरुणाईच्या भिरभिरत्या नजरा महिलांना संरक्षण प्रदान करीत नाहीत.अगदी चार वर्षाच्या बालिकेपासुन तर म्हाता-या आजीबाईपर्यंत महिला आज छळली जाते.पुरुषांच्या कैदेत असणारी महिला आजही करकर कापली जाते.संविधान असेल तरीही तिच्यावर असेच अत्याचार असेच तिचे जगणे.आजही संपत्ती तिला जमविण्याचा अधिकार नाही.संपत्तीवर पुरुषांचाच अधिकार मनुस्मृती जाळली तरी.काय कायद्यानुसार संरक्षण नाही तिला…..आहे,पण तरीही महिलांना छळलं जातं.
आजही ज्ञानमंदिरात,जिथं ज्ञान मिळतं,त्या ठिकाणी ही महिलांचे धिंडोळे काढले जातात.संचालकाच्या दबावाखाली निपचित राहतांना नक्कीच स्रीयांचा दम घुटतो.केवळ वासनेची पुर्ती करण्यासाठी ह्या महिलांचा उपयोग करुन घेणारे संचालक बरेच आहेत.कार्यालयात बाँसच्या मर्जीनं न वागल्यास बाँस काय काय करेल याची जाणीव नाही.अन् बाँसच्या मर्जीनंही वागल्यास बाँस काय काय करेल हेही सांगु न शकणारी स्री स्वतःचं स्वातंत्र्य हरवुन बसली आहे. हाच बाँस कार्यालयात त्या महिलेची परवानगी राहो अगर न राहो,छळत असतो.पोलिसस्टेशन किंवा कुठेही तक्रार केल्यास न्याय तर दुरच.बदनामी शिवाय काहीच मिळत नाही.आजही ती स्री आहे,लाचार नसली तरी लाचार आहे,गुणवान असली तरी गुणवान नाही,असा शेरा मारणारा पुरुषप्रदान व्यक्ती एखाद्या वेळी प्रेमिकेने धोका दिल्यास तिला मोनिका किरणापुरेसारखं चाकु भोपसुन मारतो.नव्हे तर ती स्री आहे म्हणुन वासना पुर्ण करण्यासाठी दिल्लीत तिच्यावर बलत्कार होतो.ह्याला महिला सक्षमीकरण म्हणता येईल काय?अगदी सातव्या वर्गापासुनच नाही तर त्याही पुर्वीपासुन स्रीला छळलं जातं.निव्वळ बाहेरच नाही तर घरीही महिलांना छळलं जातं.
हुंडा घेणे देणे हा कायद्यानं गुन्हा असतांना आजही मुलीचे लग्न करतांना मायबापाला विचार येतो.कारण ज्यांच्याकडे मुली आहेत.त्या वधुपित्याला मुलीला लहाणाचे मोठे करुनही तिचे लग्नावेळी लाखो रुपये मोजावे लागतात.शिवाय ही बातमी गुप्त ठेवावीच लागते.कारण मुलीचा संसार.जर ही बातमी फोडली तर लग्न तुटेल ही भीती.शिवाय समाजात मुलीची बदनामी.कोण मागेल माझ्या मुलीला?हा विचार.कारण समाज ह्या मुलींना मग स्विकारत नाही.त्या तशाच पडुन राहतात.शिवाय हुंडा दिलाय.तरीही मुलीच्या पाठीमागील त्रास संपला असे नाही.तिने अजुन पैसे मागावे यासाठी अजुन छळले जाते.पैशाचा तगादा वारंवार लावला जातो.
एवढेच नाही तर महिलांना ती महिला आहे म्हणुन तिने नोकरी करुनही घरची सगळी कामं तिनच करावी हेही बंधन लादलं जाते.अर्थात चुल आणि मुल हेच तिचं काम…..एवढा हुंडा देवुनही.मग पती दारुड्या भेटला तर त्याचे जिम्मेदार त्या पुरुषाला न धरता एवढा हुंडा देवुनही केवळ नशिबाला दोष देत तिथं महिलांना राहावच लागते.दारु पिवुन मारझोड सहन करत.
जळी स्थळी ही स्री सक्षम नाही.काही अपवाद सोडले तर घरंही त्यांची नसतात.मुळात स्रीयांना घर नाही.वडीलांच्या घरी वावरत असतांना तिला माझं घर म्हणता येत नाही,बापाचं घर म्हणावं लागतं.पुढे पतीच्याही घरी तेच हाल……यांचं घर म्हणावं लागतं.त्यानंतर पुत्राच्या घरीही माझ्या मुलांचं घर म्हणावं लागतं.तिला स्वतंत्र्य घरकुलच नाही.
अलिकडे तीही आपल्या नावाने घर घेते.फक्त नावानं.पण त्यावर कब्जा मात्र पुरुषाचाच.विक म्हटलं तं विकावंच लागतं.राजकारणातही आरक्षण आहे म्हणुन संधी मिळते.त्या निवडुनही येतात.पण कळसुत्री बाहुलीसारखं राज्यकारभार स्थानिक पातळीवर तिचा पतीच सांभाळतो.अंतरिक्षातही मुलगी गेली.पण त्यांचं आयोजन.पुरुषांनच केलं.आजही स्रीयांसाठी भरमसाट कायदे बनले आहेत.पण कुचकामी आहेत.केवळ पैसा हवा म्हणुन नोकरी कर.फालतुच्या गोष्टी करशिल नको,असे म्हणणा-या पुरुषामुळे महिला सक्षम व्हायच्या पुर्वीच असक्षम होते.एखाद्या स्रीने समजा वाजवलेच बाँसशी.तर या महिलांना पतीही साथ देत नाही.फुकटच्या कटकटी नको मला असे म्हणुन हा पती तिला त्यागतो.
आजही स्रीया काही अपवाद सोडल्यास एवढ्या दडपणात दिसतात की त्यांना स्वतःचा पती निवडता येत नाही.लग्न करताना मायबापाच्या मर्जीच्या मुलाशिच लग्न करावं लागतं.आज स्वयंवर जरी नसलं तरी पाहायला येणा-या मुलांसमोर तिला डोळे खाली ठेवुनच राहावं लागतं.डोक्यावर पल्लु घ्यावाच लागतो.पदर नेटनेटका ठेवावाच लागतो.वागणे ही तसेच बदलवावे लागते.नाहीतर त्याच वेळी लग्न तुटते.सगळं मुली च्याच वाट्याला.मुलगा कसाही वागला तरी त्याला कोणी बोलत नाही.
रात्री अपरात्री मुलीला बाहेर फिरण्याचा अधिकार नाही.केव्हा एखादा पुरुषी गिधाड येईल आणि लचके तोडुन जाईल याचा नेम नाही.आजही सीतेला पळवुन नेणारे रावण बरेच आहेत.त्या रावणाने तर आपल्या महालात सीतेच्या शिलाची रक्षा केली.पण आजच्या रावणांचा काही नेम नाही.
महत्वाचे म्हणजे आज स्रीयांसाठी कायदे जरी असले तरी खैरलांजी,कोपर्डी आज घडतेच आहे.स्रीयांनी सक्षम व्हावे म्हणुन कायदे बनविण्याची गरज नाही.त्याची अंमलबजावणी करण्याचीही गरज नाही.गरज आहे मानसिकता बदलविण्याची.स्रीची मानसिकता बदलविण्याची गरज नाही तर पुरुषी मानसिकता बदलणे गरजेचे आहे.त्याशिवाय आज महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया पुर्ण होणार नाही.त्यांनाही पुढे येवु द्या.जगु द्या.त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे.त्यांनाही जीव आहे.त्याही सृष्टीचा घटक आहेत.त्या जर नसतील तर ही सृष्टी काही कामाची नाही.खरं तर आपणच त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
चारदोन सोडल्या तर बाकी स्रीयांनाही आपण पुरुष म्हणुन पुढे आणण्याचा वसा घेण्याची गरज आहे.आजही मेळघाटच नाही तर सर्वच भागात स्रीया सक्षम नाहीत.राजस्थान,मध्यप्रदेश बिहार उत्तरप्रदेश एवढेच नाही तर महाराष्ट्रातही महिला सक्षम नाही आज पुरुषांचे वाईन घेणे समाजात चालते.त्यांनी व्याभिचार करणे समाजात चालते.पण स्रीयांचे एक घोट घेणे मात्र आज चालत नाही.आजही महिला बुरख्यात जगतात.नव्हे तर त्रिपल तलाकचा कायदा बनुनही खुलेआम तलाक म्हणुन आजही महिलांना घटस्फोट दिला जातो.तिनं घटस्फोटासाठी अर्ज का टाकला म्हणुन न्यायालयात भर दिवसा हत्या केली जाते.त्यानं मात्र त्रिपल तलाक म्हटलं तरी चालते.पण तिनं ते म्हणु नये.हा अट्टाहास.
खरं तर महिला सक्षमीकरण काळाची गरज आहे.आदिपासुन महिलांना स्वातंत्र्य नाही.महिला आजही सुरक्षित नाही.महिलाही सक्षम व्हाव्या.घरा दारात सगळीकडे….तिनेही आकाशात उंच झेप घ्यावी.भरारी मारावी त्यासाठी पुरुषांनी प्रयत्न करावा.तसेच महिलांनीही स्वतःला कमजोर समजु नये.त्या बाँसच्या तसेच त्या संचालकाच्या नियंत्रणात राहुन अत्याचार सहन करु नये.जर अत्याचार होत आहे असे वाटल्यास कायद्याचा आधार घ्यावा.नव्हे तर पोलिस यंत्रनेनेही कायद्यानुसार आधार द्यावा.न्यायालयानेही असेच न्याय प्रदान करावे,जेणेकरुन अत्याचार करणा-यावर धाक बसावा.त्याशिवाय महिला सक्षमीकरण होणार नाही.
अंकुश रा.शिंगाडे